डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण सीबीआयकडे
By Admin | Updated: May 9, 2014 22:23 IST2014-05-09T19:26:58+5:302014-05-09T22:23:28+5:30
तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दाभोलकर कुटुंबिय, अंनिस व पुरोगामी चवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरण सीबीआयकडे
पुणे : अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खून प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपविण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाचे दाभोलकर कुटुंबिय, अंनिस व पुरोगामी चवळीतील कार्यकर्ते यांच्याकडून स्वागत करण्यात आले आहे. मात्र पुणे पोलिसांची जबाबदारी संपलेली नसून त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिल्याने त्यांनी आणखी मेहनत घेऊन याप्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
हमीद दाभोलकर : उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा आम्ही सन्मान करतो. न्यायालयाच्या देखरेखेखाली हा तपास व्हावा अशी मागणी आम्ही केली होती. एका यंत्रणेकडून दुसर्या यंत्रणेकडे तपास सोपविताना होणारी अक्षम्य दिरंगाई याप्रकरणात होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. उच्च न्यायालयाने दिलेला संपूर्ण निकाल हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास करून कुटुंबिय, अंनिसचे कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करून पुढील दिशा ठरवू.
भाई वैद्य (ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते) : डॉक्टरांचा खून झाला त्या २० ऑगस्ट २०१३ या दिवशीच ससून हॉस्पिटल येथे याप्रकरणाचा तपास सीबीआयकडून व्हावा अशी मागणी मी केली होती. न्यायालयानेच ती जबाबदारी सीबीआयकडे दिली ते योग्यच झाले. सीबीआयने याप्रकरणाचा सखोल तपास करून छडा लावावा अशी अपेक्षा करूयात.
अविनाश पाटील (राज्य कार्याध्यक्ष, अंनिस) : डॉक्टरांच्या खुनाचा तपास कोणाकडून व्हावा, ते कोण करतेय हे फारसे महत्त्वाचे नाही तर सुत्रधाराचा छडा कधी लागणार हा महत्त्वाचा प्रश्न आहे. तपास लागत नसल्याने कार्यकर्ते प्रचंड अस्वस्थ आहेत. तपास सीबीआयकडे गेला याचा अर्थ महाराष्ट्राचे राज्यकर्ते व पोलिसांची यातून सुटका झाली असे त्यांनी समजू नये.
सुभाष वारे (राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य, आप) : डॉक्टरांचा खून झाल्यानंतर सुरूवातीच्या कालावधीतील तपास महत्त्वाचा होता. त्यावेळी पुणे पोलिसांची ढिलाई झाली त्यामुळे सुत्रधारांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयश आले. व्यवस्थेच्या विरोधात आवाज उठविणार्या कार्यकर्ते या तपासाकडे डोळे लावून बसले आहेत.
विनोद शिरसाठ (संपादक, साधना) : डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या तपास करण्याच्या क्षमता पुणे पोलिसांकडे आहेत की नाही किंवा सीबीआय याचा सक्षमपणे तपास करेल का याबाबत आपण अधिकारवाणीने सांगू शकत नाही. तज्ज्ञांना याबाबत सल्ला घेऊन राज्यशासनानेच याप्रकरणाचा तपास कुणी करावा याचा निर्णय घ्यावा अशी भुमिका आम्ही यापुर्वीच मांडली होती. सीबीआयने सुत्रधारांचा शोध लावावा अशी अपेक्षा करूयात.