नांदेड संमेलनाध्यक्षपदी डॉ. एस.एन. पठाण
By Admin | Updated: March 29, 2016 01:28 IST2016-03-29T01:28:46+5:302016-03-29T01:28:46+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त नांदेड येथे ३ एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. एस. एन. पठाण यांची निवड करण्यात

नांदेड संमेलनाध्यक्षपदी डॉ. एस.एन. पठाण
पुणे : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जन्मशताब्दीनिमित्त नांदेड येथे ३ एप्रिल रोजी होणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. एस. एन. पठाण यांची निवड करण्यात आली आहे. संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. अखिल भारतीय श्री गुरुदेव सेवामंडळ, गुरुकुंज आश्रम (जि. अमरावती) व महाराष्ट्र शासन यांच्या वतीने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
डॉ. पठाण हे अखिल भारतीय सांस्कृतिक मंडळाचे उपाध्यक्ष आणि पुणे येथील एम. आय. टी. विश्वशांती केंद्राचे सल्लागार आहेत. ते राष्ट्रसंत तुकडोेजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत.
साहित्य संमेलनात ‘राष्ट्रसंतांचे राष्ट्रनिर्मितीत योगदान’, ‘राष्ट्रसंतांच्या साहित्यातील कृषीविषयक धोरण’ आणि ‘ग्रामगीता एक जीवनग्रंथ’ हे तीन परिसंवाद होणार आहेत. यात बबनराव वानखडे, बोथे दादा, डॉ. अनंत राऊत, डॉ. माधव जाधव, नीळकंठ हळदे, प्राचार्य डॉ. साहेब खंदारे, प्रा. प्रल्हादराव भोपे, डॉ. उद्धव गाडेकर, माजी मंत्री प्रा. वसंतराव पुरके, डॉ. सुभाष सावकार आदी वक्ते भाग घेणार आहेत. समारोपप्रसंगी स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पंडीत विद्यासागर आणि दामोदर पाटील प्रमुख पाहुणे आहेत.
डॉ. पठाण यांचा सत्कार
डॉ. पठाण यांच्या निवडीबद्दल एम.आय.टी.चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी त्यांचा सत्कार केला. ‘समाजामध्ये धर्माच्या नावाखाली व जातीपातीमध्ये ध्रुवीकरण करण्याची अतिरेकी स्पर्धा लागली असताना डॉ. पठाण यांची झालेली निवड भूषणावह आहे,’ अशा शब्दांत कराड यांनी गौरव केला.