डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅनडामध्ये निधन
By Admin | Updated: May 7, 2017 04:37 IST2017-05-07T04:37:15+5:302017-05-07T04:37:15+5:30
महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थांना उत्तर अमेरिकेतून भरघोस आर्थिक मदत मिळवून देताना सर्वार्थाने त्यांचे पालकत्व

डॉ. जगन्नाथ वाणी यांचे कॅनडामध्ये निधन
विशेष प्रतिनिधी/ लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महाराष्ट्रातील अनेक सेवाभावी संस्थांना उत्तर अमेरिकेतून भरघोस आर्थिक मदत मिळवून देताना सर्वार्थाने त्यांचे पालकत्व स्वीकारणारे ज्येष्ठ ‘स्नेही’, महाराष्ट्र सेवा समिती या कॅनडास्थित संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. जगन्नाथ वाणी (८२) यांचे कॅनडातील कॅलगरी येथे भारतीय वेळेनुसार शनिवारी सकाळी साडेदहा वाजता निधन झाले. त्यांच्यामागे कॅनडास्थित मुलगा श्रीराम, सून प्रतिमा, नातवंडे, दोन मुली, धुळे परिसरातील कुटुंबीय असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर कॅनडा येथेच अंत्यसंस्कार होणार आहेत.
डॉ. वाणी यांनी कर्करोगाचा सामना मोठ्या धैर्याने केला. ते विमा-संख्याशास्त्र या विषयाचे संशोधक - प्राध्यापक होते. त्यांना ‘आॅर्डर आॅफ कॅनडा’ या कॅनडाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. धुळे परिसरात समाजोपयोगी कामांची उभारणी करणारे का. स. वाणी स्मृती प्रतिष्ठान, का. स. वाणी मराठी प्रगत अध्ययन संस्था, स्किझोफ्रेनिया अवेअरनेस असोसिएशन (सा) या संस्था त्यांनी महाराष्ट्राच्या भूमीवर रुजविल्या.
डॉ. वाणी यांच्या पत्नी कमलिनी या प्रदीर्घकाळ स्किझोफ्रेनिया या मानसिक व्याधीने ग्रस्त होत्या. त्यामुळे त्यांनी स्किझोफ्रेनिया आजारावर काम करणाऱ्या ‘सा’ संस्थेची पुण्यात स्थापना केली.