इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
By Admin | Updated: April 5, 2015 16:55 IST2015-04-05T16:52:24+5:302015-04-05T16:55:00+5:30
मुंबईतील इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

इंदू मिलमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा मार्ग मोकळा
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - मुंबईतील इंदू मिल येथील प्रस्तावित डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. इंदू मिलची जागा राज्य सरकारच्या ताब्यात येण्यासंदर्भात केंद्र सरकार आणि राज्य सरकारमध्ये करार झाला आहे. हा करार झाल्याने आता इंदू मिलमध्ये लवकरच बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम सुरु होऊ शकेल.
दादरमधील चैत्यभूमीलगतच्या इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जात आहे. रिपब्लिकन पक्षांनी या मागणीसाठी आंदोलनंही केली होती. मात्र इंदू मिलची जागा केंद्रीय वस्त्रोद्योग खात्यांतर्गत येत असल्याने स्मारकाच्या मार्गात अडथळे येत होते. भाजपाने सत्तेवर येताना इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्याचे आश्वासन दिले होते. १४ एप्रिलला या कामाचे भूमीपूजन करु अशी ग्वाहीदेखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती. या पार्श्वभूमीवर रविवारी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित महत्त्वपूर्ण करार झाला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय, महाराष्ट्र सरकार व राष्ट्रीय वस्त्र निगम यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री संतोष गंगवार यांनी करारावर स्वाक्षरी केली. या करारानंतर आता इंदू मिलच्या १२ एकरच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक बांधले जाणार आहे.