डॉ.भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी
By Admin | Updated: September 8, 2016 06:10 IST2016-09-08T06:10:55+5:302016-09-08T06:10:55+5:30
एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली

डॉ.भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी
मुंबई : एका अधिकाऱ्याच्या मुलाच्या आत्महत्येनंतर वादाच्या भोवऱ्यात सापडलेले कृषी विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ.भगवान सहाय यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली असून, सामान्य प्रशासन विभागात याच पदावर पाठविण्यात आले. या शिवाय आणखी तीन अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली.
कृषी विभागातील अधिकारी राजेंद्र घाडगे यांच्या मुलाने ते घरी लगेच घरी आले नाहीत, तर तो आत्महत्या करेल, असे फोन केले होते. त्या वेळी घाडगे हे सहाय यांच्याकडे घरी जाण्यासाठी अनुमती मागायला गेले असता त्यांना ती देण्यात आली नाही, असा आरोप आहे. घाडगे यांच्या मुलाने आत्महत्या केली. या प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटून कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन केले होते. त्यानंतर, मुख्यमंत्र्यांनी सहाय यांना सक्तीच्या रजेवर पाठविले. सहाय कृषी विभागात परत यावेत, यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचा दुसरा गट सक्रिय झाला होता. मात्र, मुख्यमंत्र्यांनी आज त्यांची सामान्य प्रशासन विभागात बदली केली. अन्य तीन अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे प्रधान सचिव श्यामलाल गोयल यांची याच पदावर महसूल व वने विभागात बदली झाली आहे. पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार हे यापुढे त्या व्यतिरिक्त कृषी विभागाचेही प्रधान सचिव असतील. चंद्रशेखर ओक हे राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त असतील. (विशेष प्रतिनिधी)