जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या
By Admin | Updated: August 28, 2016 19:25 IST2016-08-28T19:25:31+5:302016-08-28T19:25:31+5:30
जादूटोणा केल्यामुळेच एक महिला व एका बालकाचा मृत्यू झाला, या संशयावरून काही लोकांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण करून खून केला.

जादूटोण्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या
ऑनलाइन लोकमत
भंडारा, दि. 28 - जादूटोणा केल्यामुळेच एक महिला व एका बालकाचा मृत्यू झाला, या संशयावरून काही लोकांनी एका दाम्पत्याला बेदम मारहाण करून खून केला. त्यानंतर त्या दोघांचे मृतदेह जंगलात फेकून दिले. ही थरारक घटना तुमसर तालुक्यातील दावेझरी (टोला) येथे रविवारी (२८ ला) उघडकीला आली. यादोराव नारबा ढोक (६५) व कौसल्या यादोराव ढोक (५५) असे मृत पती-पत्नीचे नाव आहे.
दरम्यान या प्रकरणातील १६ संशयितापैकी १२ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून कुठलिही अप्रिय घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासनाने गावात चोख बंदोबस्त तैनात केला आहे. ४०-५० घरांची वस्ती असलेल्या दावेझरी (टोला) या गावातील घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. दावेझरीत यादोराव ढोक व त्यांची पत्नी कौसल्या ढोक राहत होते. त्यांची मुले रोजगारासाठी नागपुरात राहतात. मोलमजुरीवर त्यांचा उदरनिर्वाह होता.
मागील आठवड्यात गावात एका तीन वर्षीय बालकाचा मुत्यू झाला, त्यापुर्वी एका महिलेचा मृत्यू झाला. या दोन्ही घटनांना ढोक पतीपत्नी जबाबदार आहेत, असा काही जणांचा संशय होता. गावात यादोराव ढोक हा जादुटोणा करतो, असा समज झाल्याने गावातील कुणीही या कुटूंबियांच्या संपर्कात नव्हते. एकप्रकारे या कुटूंबावर बहिष्कार घातल्याचे चित्र होते. तीन दिवसापूर्वी एका बालकांचा मृत्यू झाला. ढोक यांनी जादुटोना केल्याने त्याचा मृत्यू झाला, असा संशय व्यक्त करीत काही जणांनी लाठी-काठ्यानी त्यांच्या घरावर हल्ला केला. शनिवारला रात्री १० वाजताच्या सुमारास झालेल्या या हल्ल्याने यादोराव व पत्नी कौसल्या चांगलेच घाबरले. त्यांनी पळून जावून एका मंदिरात आश्रय घेतला. रात्री १२ वाजताच्या सुमारास त्यांना बेदम मारहाण करीत गावातील चौकात आणण्यात आले.
या चौकात लाठी व काठ्यांनी त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. दोघांचेही मृतदेह ३ किमी अंतरावरील वनविभागाच्या कंपार्टमेंट ४४८ मध्ये मृत पती पत्नीचे मृतदेह बंद असलेल्या खाणीत फेकून दिले. रविवारला पतीपत्नी बेपत्ता असल्याची चर्चा गावात पसरली. त्यामुळे रविवारला सकाळी सिहोरा पोलिसांची चमू गावात दाखल झाली. या घटनेला जबाबदार असल्याच्या कारणावरुन पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्यास सुरूवात केली असता. पोलिसांची वाहने अडविण्यात आले. गावात तणावाचे वातावरण असल्यामुळे पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलविण्यात आली. एका संशयिताने या घटनेची कबुली दिली. या प्रकरणी पोलिसांनी शिवा बावणे, रविंद्र बावणे, गुड्डू नारनवरे, राकेश बागडे, विजय शेंडे, मनिष बावणे, शैलेष उईके, रामदास चौधरी, महेश पटले, परमानंद नारनवरे, अविनाश पटले यांना ताब्यात घेतले असून प्रमोद राऊत, दयाराम सोनवाने, भारत मडावी, बालू शरणागत हे संशयित फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
ढोक यांची मुले नागपुरहून परतलेली नाही. दरम्यान गावात या घटनेसंदर्भात कुणीही बोलण्यासाठी तयार नाहीत. शवविच्छेदनासाठी मृतदेह तुमसर उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही उशिरापर्यंत सुरूच होती.