दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: February 16, 2017 03:53 IST2017-02-16T03:53:43+5:302017-02-16T03:53:43+5:30
विषारी औषध पिवून दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पतीवर

दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न
नवी मुंबई : विषारी औषध पिवून दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना घणसोली येथे घडली आहे. यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला तर पतीवर कोपरखैरणेतील रुग्णालयात उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. रबाळे पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.
घणसोली सेक्टर ७ सिम्प्लेक्स येथील श्री गणेश सोसायटीमध्ये बुधवारी सकाळी ही घटना घडली. नंदा माने (४०) व प्रकाश माने (४५) अशी त्यांची नावे आहेत. नंदा या जमिनीवर कोसळल्याचे शेजाऱ्यांना समजताच त्यांनी त्यांच्या घराच्या दिशेने धाव घेतली. प्रकाश माने यांची देखील प्रकृती अस्वस्थ असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यामुळे लगतच्या रहिवाशांनी दोघांनाही कोपरखैरणेतील खासगी रुग्णालयात दाखल केले. यावेळी नंदा यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले, तर प्रकाश यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. झाडांवर कीटकनाशक फवारणीसाठी वापरायचे औषध पिवून त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते. हे औषध अनेक महिन्यांपासून त्यांच्या घरात ठेवण्यात आले होते. प्रकाश माने यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. सोसायटी आवारातच त्यांचा फेरीवाला व्यवसाय होता. त्यांना दोन मुले असून मोठा मुलगा शिक्षण घेत आहे. दोन्ही मुले घराबाहेर गेलेली असताना त्यांनी हा प्रकार केला. मात्र या दाम्पत्याने आत्महत्या करण्यामागचे मूळ कारण अद्याप समोर आलेले नाही. (प्रतिनिधी)