मध्य रेल्वे प्रवाशांना डबल ‘जॅकपॉट’
By Admin | Updated: September 11, 2014 03:28 IST2014-09-11T03:28:54+5:302014-09-11T03:28:54+5:30
मध्य रेल्वेमार्गावरील सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गासाठी रेल्वे बॉर्डाकडून ९00 कोटी रुपये खर्च प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे

मध्य रेल्वे प्रवाशांना डबल ‘जॅकपॉट’
मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील सीएसटी ते कुर्ला पाचव्या-सहाव्या मार्गासाठी रेल्वे बॉर्डाकडून ९00 कोटी रुपये खर्च प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यात परेल टर्मिनसच्या कामाचाही खर्च असून, त्यामुळे परेल टर्मिनसचा मार्गही मोकळा झाला आहे. मध्य रेल्वे प्रवाशांसाठी हा एकप्रकारे डबल जॅकपॉटच लागला आहे. त्यामुळे आता रेल्वेकडून त्वरित निधी उपलब्ध झाला की या प्रकल्पाच्या कामाला गती मिळेल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
एमयूटीपी-२ अंतर्गत सीएसटी ते कुर्ला पाचवा-सहावा मार्गाच्या प्रकल्पाचे काम करण्यात येणार आहे. एमयूटीपी-२ अंतर्गत येणाऱ्या प्रकल्पांची कामे २0१४ च्या अखेरीस पूर्ण केली जाणार होती. मात्र निधीच उपलब्ध होत नसल्याने अनेक कामे रखडली होती. यात सीएसटी ते कुर्ला या पाचव्या-सहाव्या मार्गाचा समावेश होता. एकूण ९00 कोटी रुपये किंमत असलेल्या या प्रकल्पासाठी निधी उपलब्ध होत नसल्याने प्रकल्पाचे कामच सुरू झाले नव्हते. या कामाच्या खर्चाचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाकडे पडून होता. अखेर पाचव्या-सहाव्या मार्गाच्या या प्रस्तावाला रेल्वे बोर्डाकडून मंजुरी देण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे कुर्ला ते सीएसटी अशा पाचव्या-सहाव्या मार्गात अनेक अडथळे असून, हा प्रकल्प परेलपर्यंतच नेण्याचा प्रयत्न रेल्वेकडून केला जात आहे. परेलपुढे पाचव्या-सहाव्या मार्गासाठी लागणारी जागाच उपलब्ध नसून अनेक ठिकाणी असलेल्या अतिक्रमणामुळे मोठी समस्या उद्भवली आहे. त्यामुळेच परेलपर्यंतच या मार्गाचे काम करण्याचा विचार आहे.
त्याचबरोबर दादर स्थानकातील लोकलचा वाढता भार कमी करण्यासाठी म्हणून परेल टर्मिनसचा नवीन प्रस्तावही मध्य रेल्वेकडून तयार करण्यात आला होता. पाचव्या-सहाव्या मार्गाच्या प्रस्तावातच या प्रस्तावाला समाविष्ट करण्यात आले आहे. परेल टर्मिनसाठी ८0 कोटी रुपये खर्च येणार असून, मंजूर करण्यात आलेल्या ९00 कोटी रुपयांच्या खर्चात परेल टर्मिनसचाही खर्च समाविष्ट करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)