डबलडेकर रेल्वे पुन्हा होणार सुरु

By Admin | Updated: February 18, 2015 23:48 IST2015-02-18T22:12:55+5:302015-02-18T23:48:36+5:30

नीलेश राणेंचे प्रयत्न : रेल्वेच्या समस्यांविरोधात लढा कायम राहणार

The double-decker railways will start again | डबलडेकर रेल्वे पुन्हा होणार सुरु

डबलडेकर रेल्वे पुन्हा होणार सुरु

रत्नागिरी : अनेक समस्यांच्या गर्तेत कोकण रेल्वे सापडली असतानाच, नागरी सत्कार स्वीकारण्यासाठी येणाऱ्या केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यासमोर माजी खासदार नीलेश राणेंनी काळे झेंडे दाखवून आंदोलन केले होते. त्यांच्या या आंदोलनाला यश आले असून, कोकण रेल्वे प्रशासनाने कोकणात पुन्हा एकदा डबल डेकर रेल्वे सुरु केली आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना नीलेश राणे यांनी सांगितले की, कोकणातील जनतेच्या कोकण रेल्वे संदर्भातील समस्या सोडवण्यासाठी लढा सुरुच ठेवणार आहे. दोन दशकांचा कालावधी होत असतानाही अद्याप कोकण रेल्वेच्या समस्या संपलेल्या नाहीत, तर त्या अधिकाधिक वाढत आहेत. मुंबईतील चाकरमान्यांना चांगला पर्याय असतानाही, कोकण रेल्वेचे दुपरीकरण अद्यापही रखडलेले आहे. हायस्पीड रेल्वे किंवा बुलेट ट्रेन कोकणसाठी स्वप्नच ठरले असून, अनेक गाड्यांना अद्यापही महत्त्वाच्या ठिकाणी थांबे नाहीत. राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानक अद्यापही प्रलंबित आहे. तसेच गणपती उत्सवाच्या दरम्यान सुरु केलेली डबलडेकर रेल्वे ही अवघ्या तीन महिन्यात बंद करण्यात आली. ती डबलडेकर दक्षिणेकडेही गेली. गतवर्षी दसरा दिवाळीच्या सुमारास या डबलडेकरने ३० फेऱ्यांमधून तब्बल १ कोटी २६ लाख एवढे उत्पन्न मिळवले होते. याच कालावधीत सुमारे २१ हजार प्रवाशांनी या डबलडेकरने प्रवास केला. कोकण रेल्वे मार्गावरुन धावणाऱ्या या डबल डेकर गाडीला ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी यासह थिवीम येथे थांबे देण्यात आले होते. ही डबलडेकर बंद झाल्यानंतर प्रवाशांमधून निराशा व्यक्त झाली. नेहमीच कोकण रेल्वेने कोकणावर अशा प्रकारे अन्याय केला. डबलडेकर रेल्वे गाडीसह अन्य मुद्दे घेऊन माजी खासदार नीलेश राणे यांनी जनतेच्या भल्यासाठी रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आणि सुरेश प्रभू यांच्या रत्नागिरी दौऱ्यामध्ये निदर्शने केली. याशिवाय, कोकण रेल्वेतील प्रवाशांची लूट, रेल्वे अपघातांमध्ये होत असलेली वाढ, प्रवाशांची सुरक्षितता हे ठळक मुद्देही नीलेश राणे यांनी या आंदोलनाच्या निमित्ताने प्रकाशात आणले. नीलेश राणे यांनी केलेल्या या आंदोलनाचा परिणाम म्हणून कोकण रेल्वे प्रशासनाने नमते घेत डबलडेकर गाडी पुन्हा सुरु केली आहे. याबाबत प्रतिक्रया देताना, नीलेश राणे यांनी सांगितले की, कोकण रेल्वेच्या समस्या सोडवण्यासाठी आंदोलन करणे आवश्यक असेल, तर ते जनतेसाठी मी करेन. पण, कोकणी जनतेवर होणारा अन्याय खपवून घेणार नाही. कोकण रेल्वेची एक समस्या सुटली आहे, पण आणखी बऱ्याच समस्या आहेत. या समस्या सोडवण्यासाठी मी माझा लढा सुरूच ठेवणार, असे मत नीलेश राणे यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)


दोन दशकानंतरही कोकण रेल्वेच्या समस्या संपलेल्या नाहीत : नीलेश राणेंचे मत.
कोकण रेल्वेचे दुपदरीकरणही रखडले, हायस्पीड रेल्वे, बुलेट ट्रेन हे कोकणसाठी स्वप्नच : राणे
कोकणी जनतेवरील अन्याय खपवून न घेण्याचा नीलेश राणे यांनी दिला इशारा.

Web Title: The double-decker railways will start again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.