दारूबंदीचे पत्र विक्रेत्यांच्या दारात
By Admin | Updated: March 20, 2015 01:26 IST2015-03-20T01:26:55+5:302015-03-20T01:26:55+5:30
महिला संघटनांच्या सततच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने याचवर्षी २० जानेवारीला चंद्रपूरमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे.

दारूबंदीचे पत्र विक्रेत्यांच्या दारात
बंदीपूर्वीच दारूटंचाई : साठा संपविण्याची विक्रेत्यांची धडपड
मंगेश भांडेकर - चंद्रपूर
महिला संघटनांच्या सततच्या आंदोलनाची दखल घेत सरकारने याचवर्षी २० जानेवारीला चंद्रपूरमध्ये दारूबंदीचा निर्णय घेतला. १ एप्रिलपासून याची अंमलबजावणी होणार आहे. तसे पत्र दारूविक्रेत्यांच्या दारी पोहोचले असून, विक्रेत्यांनी दारूसाठा ३१ मार्चअगोदर संपवण्यासाठी धडपड सुरू केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात बंदीपूर्वीच दारूटंचाई निर्माण झाल्याचे चित्र आहे.
राज्य शासनाने अध्यादेश काढून १ एप्रिलपासून दारूबंदी निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणेला दिले आहेत. शासनाचा हा अध्यादेश प्रशासनाने १८ मार्चला प्रत्येक दारूविक्रेत्याच्या हाती सोपविला आहे. १ एप्रिलनंतर दारू विकता येणार नसल्याने विक्रेत्यांनीही दारूसाठा लवकरात लवकर विकण्याचा प्रयत्न चालविला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदीसाठी महिलांनी सातत्याने आंदोलने केली आहेत.
भद्रावतीत आज
मुंडण आंदोलन
राज्य शासनाच्या दारूबंदीच्या निर्णयामुळे बार, रेस्टॉरंट येथे काम करणाऱ्या कामगारांवर उपासमारीची पाळी आली आहे. राज्य शासनाच्या या निर्णयाविरोधात कामगारांनी
२० मार्चला भद्रावती बंदचे आवाहन केले असून, तहसीलसमोर सामूहिक मुंडण आंदोलन करण्यात येणार आहे.
१ एप्रिलपासून जिल्ह्यात दारूबंदी होणार असल्याने पोलीस यंत्रणेने संपूर्ण तयारी केली आहे. आतापासूनच आम्ही कामाला लागलो आहोत. अवैध दारूविक्रीच्या विरोधात कठोर पावले उचलण्याच्या संदर्भात जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील सीमेवरील चेक पोस्ट नाक्यांना सतर्कराहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- डॉ. राजीव जैन, जिल्हा पोलीस अधीक्षक, चंद्रपूर