डोंबिवलीत डेंग्यूचा बळी?

By Admin | Updated: July 4, 2016 03:44 IST2016-07-04T03:44:41+5:302016-07-04T03:44:41+5:30

डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत विजय ब्राह्मणे या चार वर्षांचा मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली.

Dombivli is a victim of dengue? | डोंबिवलीत डेंग्यूचा बळी?

डोंबिवलीत डेंग्यूचा बळी?


कल्याण : वातावरणातील बदलामुळे एकीकडे कल्याण-डोंबिवलीत तापाचे रुग्ण वाढत असताना डोंबिवलीतील सागर्ली परिसरातील निशांत विजय ब्राह्मणे या चार वर्षांचा मुलाचा डेंग्यूने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. तो राहत असलेल्या विठ्ठल प्लाझा इमारतीतील १० ते १२ रहिवाशांनाही ताप आला असल्याने डेंग्यूच्या आजाराने डोके वर काढले की काय, असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान, केडीएमसीच्या आरोग्य विभागाचा अहवाल आल्यानंतरच निशांतचा मृत्यू डेंग्यूने झाला की नाही, हे स्पष्ट होईल, असे म्हटले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून निशांतला ताप येत होता. डोंबिवलीतील एका खाजगी रुग्णालयात त्याला उपचाराकरिता दाखल केले होते. निशांतला ताप असताना काविळीचीही लागण झाल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली. त्याला कल्याणच्या एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. परंतु, शुक्रवारी तेथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचा दावा त्याच्या नातेवाइकांनी केला आहे. स्थानिक नगरसेविका डॉ. सुनीता पाटील यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. परंतु, केडीएमसीच्या आरोग्य विभागाने मात्र यासंदर्भातील अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे स्पष्ट केले. दरम्यान, सागर्ली परिसरातील विठ्ठल प्लाझा इमारतीतील तापाचे वाढते रुग्ण पाहता आरोग्य विभागाने संबंधितांच्या रक्ताचे नमुने तपासणीकरिता घेतले असून या परिसरात आरोग्य विभागाकडून जंतुनाशक फवारणी करण्यात आल्याची माहिती नगरसेविका पाटील यांनी दिली. वातावरणातील बदलामुळे तापाचे रुग्ण वाढत आहेत. यात डेंग्यूनेदेखील डोके वर काढल्याने आरोग्य विभागाचा साथीचे आजार नसल्याचा दावा एक प्रकारे फोल ठरला आहे. (प्रतिनिधी)
>तापाची साथ नाही
यासंदर्भात आरोग्य विभागाचे प्रभारी अधिकारी लीलाधर मस्के यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी शहरात कोणत्याही प्रकारच्या तापाची साथ नसल्याचे सांगितले. पावसाने जोर धरल्याने वातावरणात बदल झाला आहे. अशा वातावरणबदलामध्ये काही प्रमाणात तापाचे रुग्ण आढळतातच. निशांत ब्राह्मणे याचा मृत्यू डेंग्यूने झाल्याचे बोलले जात असले तरी त्याच्यावर उपचार केलेल्या डॉक्टरांकडून अहवाल आल्यानंतरच याप्रकरणी बोलणे उचित ठरेल, असे मस्के यांनी सांगितले. निशांत राहत असलेल्या ठिकाणी आणि ताप आलेल्या रहिवाशांच्या रक्ताचे नमुनेदेखील घेण्यात आले असून परिसराचे सर्वेक्षण करण्यात आल्याचेही ते म्हणाले.

Web Title: Dombivli is a victim of dengue?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.