डोंबिवलीत पाच दिवसांच्या मुलीचा गूढ मृत्यू!
By Admin | Updated: March 13, 2015 05:42 IST2015-03-13T05:42:11+5:302015-03-13T05:42:11+5:30
येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा त्याच हॉस्पिटलच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी

डोंबिवलीत पाच दिवसांच्या मुलीचा गूढ मृत्यू!
डोंबिवली : येथील शुभदा नर्सिंग होममध्ये पाच दिवसांपूर्वी जन्मलेल्या मुलीचा त्याच हॉस्पिटलच्या आवारात मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी सकाळी ८.३०च्या सुमारास घडली. या नवजात अर्भकाला रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरून फेकल्याचीही चर्चा आहे. या गूढ मृत्यूबद्दल पोलीस तपास करीत आहेत.
पाच दिवसांपूर्वी ८ मार्च रोजी अंबरनाथ येथील सुजाता दत्ता गायकवाड (२७) या महिलेने सिझेरियन शस्त्रक्रियेनंतर या मुलीला जन्म दिला होता. गुरुवारी बाळ-बाळंतिणीस घरी सोडण्यात येणार होते. गुरुवारी सकाळी ७.३० वा. डॉक्टरांनी नेहमीप्रमाणे सर्व तपासणी केली. त्यानंतर तासाभराने या रुग्णालयाच्या डॉ. हर्षदा पुष्कर प्रधान यांना ते बाळ रुग्णालयाच्या मागील बाजूच्या आवारात खाली पडल्याचे आढळून आले. तपासणी केली असता, ती नवजात मुलगी मृत झाल्याचे त्यांना आढळले. तिच्या डोक्याला मार लागला होता, असे सूत्रांकडून समजते. खबर मिळताच रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील शिवरकर आणि त्यांच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. सर्व संबंधितांची चौकशी केल्यावर आणि मृत बाळाचे कल्याणच्या रुक्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदन पार पडल्यावर सायंकाळी ४ च्या सुमारास मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आला.
तिचा मृत्यू नेमका कशामुळे आणि कोणामुळे झाला, याबाबतची माहिती पोलीस मिळवत आहेत. जेव्हा ही घटना घडली, तेव्हा रुग्णालयात बाळाची आईसह तिच्या दोन्हीकडच्या आजी उपस्थित होत्या. त्यांच्यासह रुग्णालयातील कर्मचारी व इतर रुग्ण यांच्या चौकशीतून संध्याकाळपर्यंत कोणतीही ठोस माहिती मिळाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
फेकले की मारून ठेवले?
जेथे बाळाने जन्म दिला ती जागा आणि त्यांना ठेवण्यात आलेला वॉर्ड ही जागा दुस-या मजल्यावर आहे. मात्र ते बाळ जेव्हा मयत आढळले तेव्हा ते रुग्णालय इमारतीच्या तळमजल्यावरील खालच्या बाजूला पडलेले आढळले. म्हणजे त्या बाळाला फेकण्यात आल्याने त्याचा मृत्यू झाला का? याचही तपास पोलीस करीत आहेत. बाळाला कोठेही बाह्य रक्तस्त्राव झाला नाही. डोक्याला आतून मार लागल्याचे सांगण्यात आले. दुस-या मजल्यावरुन ते बाळ पडले अथवा फेकले असते तर त्याला बाह्य दुखापत व्हायला हवी होती, ती का झाली नाही असा सवाल आहे.