डोंबिवलीतील ‘त्या’ प्रवेशद्वाराचे भिजत घोंगडे!
By Admin | Updated: April 28, 2016 03:44 IST2016-04-28T03:44:52+5:302016-04-28T03:44:52+5:30
रेल्वेस्थानकातील मधल्या पादचारी पुलाला पश्चिमेकडे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी जोर धरत आहे.

डोंबिवलीतील ‘त्या’ प्रवेशद्वाराचे भिजत घोंगडे!
डोंबिवली : रेल्वेस्थानकातील मधल्या पादचारी पुलाला पश्चिमेकडे प्रवेशद्वार खुले करण्याची मागणी जोर धरत आहे. या संदर्भात प्रवासी, विविध राजकीय पक्षांनी स्थानक प्रबंधक आणि मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहारही केला. मात्र त्यास अजूनही रेल्वेने सकारात्मक प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे पश्चिमेत स्थानकाबाहेरून बस सोडण्याचा प्रस्तावही कागदावरच राहीला आहे.
स्थानकातील मुंबई दिशेकडील पादचारी पूल देखभाल व दुरुस्तीसाठी बंद आहे. त्यामुळे प्रवाशांना मधल्या पादचारी पुलाचा वापर करावा लागत आहे. त्यासाठी त्यांना फलाट क्रमांक एक ‘ए’मध्ये शिरून हा पूल चढावा लागतो. त्यामुळे पश्चिमेकडे प्रवेशद्वारे खुले करावे, अशी जोरदार मागणी प्रवाशांनी स्थानक प्रबंधकांच्या कार्यालयात केली. परंतु, त्यास रेल्वेकडून प्रतिसाद मिळाला नाही.
या संदर्भात गेल्या महिन्यात केडीएमटीचे सभापती भाऊ चौधरी, सभागृह नेते राजेश मोरे, किशोर मानकामे, दीपक भोसले आदींनी पाहणी केली होती. (प्रतिनिधी)
>शहराचे प्रवेशद्वार लवकरच होणारे खुले ?
प्रवेशद्वार लवकरच खुले केले जाईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांनी काही सामाजिक संस्थांना सांगितले आहे. मात्र ते नेमके कधी खुले होईल, याबाबत काहीच स्पष्टपणे सांगितलेले नाही.
जूनमध्ये पावसाळा सुरू होतो. त्यामुळे रेल्वे कोणतेही नवीन काम हाती घेत नाही. त्यामुळे मे महिन्यातच ही सुविधा मिळाली तर मिळू शकते, अन्यथा आक्टोबरपर्यंत वाट बघावी लागते असे जाणकारांचे मत आहे.
खासदार आणि आमदारांनी त्यासाठी पाठपुरावा करावा आणि वेळीच प्रवेशद्वारे खुले होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. प्रवासी हिताचे निर्णय रेल्वेने तातडीने घ्यावेत, अशी अपेक्षा आहे.