श्वानांना त्वचारोगाची लागण
By Admin | Updated: September 20, 2016 02:10 IST2016-09-20T02:10:04+5:302016-09-20T02:10:04+5:30
सध्या शहरात भटकणाऱ्या श्वानांना त्वचारोगसदृश आजाराची लागण झाल्याचे चित्र दिसत आहे.

श्वानांना त्वचारोगाची लागण
तळवडे : सध्या शहरात भटकणाऱ्या श्वानांना त्वचारोगसदृश आजाराची लागण झाल्याचे चित्र दिसत आहे. अंगावरील केस गळून गेलेले, त्वचा लालसर व कोरडी पडल्यामुळे सारखे अंग खाजवणारे श्वान जागोजागी दिसत आहेत. शहरात वाढलेली भटक्या कुत्र्यांची संख्या हा चिंतेचा विषय आहे. याला कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये शहर परिसरातील कचऱ्याचे ढीग कारणीभूत ठरत आहेत. नागरिकांनी टाकलेल्या अन्नावर भटकी कुत्री पोसली जात असल्याने दिवसेंदिवस कुत्र्यांची संख्या वाढतच आहे.
संख्या वाढल्याने टोळक्या-टोळक्यांनी भटकणाऱ्या कुत्र्यांमुळे नागरिकांवर बऱ्याच वेळा आणीबाणीचे प्रसंग बेतले आहेत. अलीकडील काही दिवसांमध्ये काही कुत्र्यांच्या अंगावरील केस गळून त्वचा लाल झालेली आहे. त्यातच अंगाला खाज सुटली आहे. अशा प्रकारच्या त्वचारोगाचा प्रादुर्भाव झालेली कुत्री ठिकठिकाणी दिसून येत आहेत. सध्याचा काळ हा श्वान प्रजातीच्या प्रजननाचा हंगाम असल्यामुळे एकमेकांच्या संपर्कात आल्याने या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. या रोगाची लागण झाल्यामुळे अशक्त झालेली कुत्री एकतर आडोशाला किंवा जागा मिळेल तेथे पडून असतात. काही कुत्री त्याच ठिकाणी गतप्राण झाल्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. यामुळे त्यांच्या या आजाराचा इतर प्राण्यांच्या आरोग्यावर दुष्पपरिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन लागण झालेल्या कुत्र्यांवर उपचार करणे गरजेचे आहे. तसेच श्वानांची संख्या वाढू नये यासाठी निर्बिजीकरणासारखी प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविली जावी, अशी मागणी सजग नागरिक करीत आहेत. अशा आजारांनी ग्रस्त असलेली कुत्री किंवा इतर प्राणी मानवी वस्तीच्या परिसरात आढळल्यास महापालिकेशी संपर्क करावा. त्या कुत्र्यांना तसेच प्राण्यांना संगोपन केंद्रात नेऊन त्यांच्यावर उपचार केले जातील, अशी माहिती पशुवैद्यकीय विभागाने दिली आहे. (वार्ताहर)
शहरात सध्या मोकाट कुत्र्यांना विविध प्रकारचे सांसर्गिक कातडीचे आजार, तसेच विविध प्रकारची विषाणुजन्य खरुज झाल्याचे दिसून येते. सदर कातडीचे आजार अथवा खरुज हे सूक्ष्म, अतिसूक्ष्म, बुरशीजन्य परोपजीवी (गोचिड, पिसवा इत्यादी) कोटी अथवा जीवाणूंमुळे होतात. तसेच पावसाळ्यात बहुतेक कुत्र्यांना पचनाचे विकार आढळून येतात. त्यामुळे कुत्र्यांना रक्ताचे जुलाब, उलट्या झाल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. सांसर्गिक आजार असल्यामुळे मानव, तसेच इतर प्राण्यांना ते होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक आरोग्यविषयक खबरदारी घेणे आवश्यक आहे. अशा आजारांनी ग्रस्त कुत्र्यांचा संपर्क टाळावा. औषधे, पावडर यांची फवारणी करावी. तसेच पाळीव प्राण्यांना प्रतिबंधात्मक लसीकरण करवून घ्यावे.
- डॉ. सतीश गोरे, पशुवैद्यकीय अधिकारी,
पिंपरी-चिंचवड महापालिका