Anjali Damania Devendra Fadnavis News: 'तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का?', असा संतप्त सवाल करत अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला घेरले आहे. मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग उपोषण सुरू केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल केले आहेत.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले तरी तपास कोणतीही प्रगती नसल्याचे सांगत देशमुख कुटुंबीय आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. आठ मागण्या सरकारकडे करण्यात आलेल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास पाणीही न पिण्याचा इशारा देण्यात आला आहे.
२५ फेब्रुवारीपासून मस्साजोगमध्ये अन्नत्याग आंदोलन सुरू झाले. या आंदोलनाकडे अंजली दमानिया यांनी महायुती सरकारचे लक्ष वेधले आहे. अंजली दमानिया यांनी एक पोस्ट करत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल केले आहेत.
अंजली दमानियांच्या पोस्टमध्ये काय?
"आज मस्साजोगच्या सगळ्या ग्रामस्थांना अन्नत्याग आंदोलन करताना बघून खूप दुःख होतय. सामान्य माणूस असणं गुन्हा आहे. तुम्ही मंत्री संत्री असाल, तर सगळी यंत्रणा कामाला लागते. तुम्ही साधे सरपंच असाल तर तुमच्या परिवारला न्याय मागण्यासाठी अन्नत्याग आंदोलन करावं लागतं", असा संताप अंजली दमानियांनी व्यक्त केला.
देवेंद्र फडणवीस यांना दोन सवाल
"आजतागायत पोलिसांनी एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन महाराष्ट्राला माहिती दिली नाही. तीन महिने होत आले, तरी एक आरोपी सापडत नाही. वकिलांची नियुक्ती होत नाही. तपास किती अयोग्य पद्धतीने झाला याची माहिती तरी मुख्यमंत्र्यांना आहे का? बालाजी तांदळेला घेऊन पोलीस फिरत होते, हे गृहमंत्र्यांना माहित आहे का?", असे सवाल करत "कृपाकरून त्या ग्रामस्थांना न्याय द्या", अशी मागणी अंजली दमानियांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
आठ मागण्यांसाठी अन्नात्याग आंदोलन
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना मदत करणाऱ्यांना सहआरोपी करणे, ज्या पोलिसांनी मदत केलीये, त्यांना बडतर्फ करून सहआरोपी करणे, दोन सायबर तज्ज्ञांचा चौकशी पथकामध्ये समावेश करणे, उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करणे, कृष्णा आंधळेला लवकरात लवकर अटक करणे यासह आठ मागण्या मस्साजोगच्या ग्रामस्थांच्या आहेत.