‘ऐ मेरे वतन की..’ची रॉयल्टी शहिदांच्या विधवांपर्यंत पोहोचते का?
By Admin | Updated: August 17, 2014 00:52 IST2014-08-17T00:52:09+5:302014-08-17T00:52:09+5:30
‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी’ या अजरामर गीताचे रचयिते राष्ट्रकवी प्रदीप यांनी या गाण्यातून मिळणाऱ्या रॉयल्टीची रक्कम सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांच्या विधवांना

‘ऐ मेरे वतन की..’ची रॉयल्टी शहिदांच्या विधवांपर्यंत पोहोचते का?
मितुल प्रदीप यांची शंका : सारेगामा व संरक्षण मंत्रालयाने खुलासा करण्याची मागणी
नागपूर : ‘ऐ मेरे वतन के लोगो, जरा आँख मे भर लो पानी’ या अजरामर गीताचे रचयिते राष्ट्रकवी प्रदीप यांनी या गाण्यातून मिळणाऱ्या रॉयल्टीची रक्कम सीमेवर लढणाऱ्या शहीद सैनिकांच्या विधवांना समर्पित केली होती. परंतु या रकमेविषयी कुणालाही कुठल्याही प्रकारची माहिती नाही. सारे गौडबंगाल आहे, अशी शंका उपस्थित करीत ती रक्कम खरेच संरक्षण विभागापर्यंत पोहोचते का? आणि शहीद सैनिकांच्या विधवांसाठीच ती रक्कम खर्च केली जाते किंवा नाही, यासंदर्भात संरक्षण विभागाने आणि या सारेगामा या संगीत कंपनीने खुलासा करावा, अशी मागणी कवी प्रदीप यांच्या कन्या आणि कवी प्रदीप फाऊंडेशनच्या सचिव मितुल प्रदीप यांनी आज येथे केली.
शनिवारी शंकरनगर चौकस्थित राष्ट्रभाषा संकुलमधील वनराईच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वनराईचे विश्वस्त गिरीश गांधी आणि कवी प्रदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष खा. अविनाश पांडे उपस्थित होते. मितुल यांनी सांगितले, कवी प्रदीप हे राष्ट्रवादी होते. लोकांना प्रेरणा मिळेल अशा गीतांची रचना त्यांनी केली. चीनसोबत झालेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या अजरामर गीताची रचना केली. युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना त्यांनी हे गीत अर्पण केले. तसेच या गीताच्या रूपात मिळणारी रॉयल्टी त्यांनी शहीद सैनिकांच्या विधवांना समर्पित केली. ‘एचएमव्ही’ या संगीत कंपनीने हे गीत रेकॉर्ड केले होते.
सध्या ही कंपनी सारेगामा म्हणून ओळखली जाते. ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे अजरामर गीत आजही प्रसिद्ध आहे. संगीत कंपनी या गीतातून आजही मोठ्या प्रमाणावर पैसा कमविते.
परंतु त्याच्या रॉयल्टीची रक्कम ही शहीद सैनिकांच्या विधवांसाठी खर्च केली जाते किंवा नाही याची माहिती नाही. मध्यंतरी यासंदर्भात एक जनहित याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. तेव्हा न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार काही रक्कम मिळाली होती. तसेच त्यासंदर्भात कवी प्रदीप यांच्या कुटुंबीयांनाही माहिती देण्याचे सांगण्यात आले होते.
कंपनीला विचारणा केली तर रॉयल्टीची रक्कम संरक्षण विभागाला दिली जात असल्याचे सांगितले जाते. डिफेन्सला विचारले तर तेही म्हणतात की रक्कम मिळते.
प्रदीपजींचे गीत आनंदभवनात अजूनही संरक्षित
तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत २७ फेब्रुवारी १९६३ रोजी दिल्लीतील नॅशनल स्टेडियमवर ‘ऐ मेरे वतन के लोगो’ हे गीत लता मंगेशकर यांनी गायले. गीत ऐकून पं. नेहरू यांच्या डोळ्यात अश्रू आले. त्यांनी गीत लिहिणाऱ्या गीतकाराबाबत विचारले. परंतु त्या कार्यक्रमाला कवी प्रदीप यांना आमंत्रितच करण्यात आले नव्हते. याबाबत प्रदीप यांना कुठलीही खंत नव्हती. त्याचे वाईटही त्यांनी वाटून घेतले नाही. त्यानंतर २१ मार्च रोजी पं. नेहरू मुंबईच्या दौऱ्यावर आले. तेव्हा त्यांनी पुन्हा कवी प्रदीप यांच्याबाबत विचारणा केली. तेव्हा तत्कालीन संरक्षणमंत्री शंकरराव चव्हाण हे कवी प्रदीप यांच्या घरी आले. त्यांनी प्रदीप यांना राजभवनावर नेले. तिथे त्यांच्याशी मनमोकळी चर्चा केली. तसेच त्याच ठिकाणी त्यांनी गीत लिहून दिले. ते गीत आजही ‘आनंदभवन’ या पं. नेहरू यांच्या निवासस्थानातील संग्रहालयात सुरक्षित आहे.
तसेच रॉबर्ट मनी हायस्कूल मुंबई येथे एक कार्यक्रम होता. त्या कार्यक्रमात पं. नेहरू यांनी कवी प्रदीप यांना आमंत्रित केले. त्या कार्यक्रमात कवी प्रदीप यांनी नेहरूजींच्या समोर ऐ मेरे वतन के.. हे गीत सादर केले. ही आठवणसुद्धा मितुल यांनी सांगितली. (प्रतिनिधी)