वाडा : पावसाळा सुरू होण्यासाठी काही दिवस राहिले असून पावसाळ्यात विजेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून देखभाल दुरुस्ती व झाडांच्या फांद्या तोडण्याची कामे युध्दपातळीवर सुरू करा अशी मागणी नागरिकांनी महावितरणकडे केली आहे. वीजवाहक तारांना अडथळा आणणारी झाडे किंवा त्यांच्या फांद्या या न तोडल्यास पावसाळ्यात वादळाने वीजवाहक तारांवर पडून विजेचा खोळंबा होतो.पर्यायाने नागरिकांना अंधारात राहावे लागते. तसेच काही गावात वाकलेले पोल, धोकादायक तारा व जुनी विद्युत उपकरणे बदलणे अशी कामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी करा जेणेकरून नागरिकांना पावसाळ्यात विजेचा त्रास होणार नाही. घोणसई नळपाणी पुरवठा योजनेला विद्युत पुरवठा करणारा विजेचा खांब वाकल्याने पावसाळ्यात तो अधिक वाकून विद्युत पुरवठा खंडित होऊ शकतो अशी भीती या ग्रामपंचायतीच्या सरपंच अश्विनी घोरकणे यांनी व्यक्त केली आहे.गावोगावी अशा प्रकारचे पोल किंवा लोंबकळणाऱ्या तारा असतील त्यांची देखभालीची कामे करावीत अशी मागणी नागरिक करीत आहेत. भिवंडी वाडा महामार्गावर अगदी रस्त्यालगत विजेचे खांब उभे केले आहेत.हे विजेचे खांब पडून अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने हे खांब रस्त्या पासून काही अंतरावर हलवावेत अशी मागणी प्रवासी करीत आहेत. गेल्या वर्ष दोन वर्षात महावितरण कंपनीने वाडा तालुक्यातील बहुतांशी गावातील विजेचे सडलेले खांब व गंजलेल्या व लोंबकळणाऱ्या तारा तसेच इतर उपकरणे बदलली असल्याने विजेचा प्रश्न येथे मोठयÞा प्रमाणात राहिला नाही.त्यामुळे विजेसाठी होणारी अनेक आंदोलने आता शमली आहेत. (वार्ताहर)
दुरुस्तीची कामे पावसाळ्यापूर्वी करा
By admin | Updated: June 7, 2016 07:43 IST