पोलीस बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करतात?
By Admin | Updated: May 6, 2015 04:45 IST2015-05-06T04:45:32+5:302015-05-06T04:45:32+5:30
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखाते आणि पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही टिकास्त्र सोडले आहे.

पोलीस बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करतात?
डोंबिवली : आतापर्यंत मित्रपक्ष शिवसेना व विरोधकांच्याच निशाण्यावर असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अखत्यारीतील गृहखाते आणि पोलिसांवर भाजपचे ठाण्याचे आमदार संजय केळकर यांनीही टिकास्त्र सोडले आहे. ह्यमुंबईतील पोलिस राज्यातील बड्या लोकांच्या इशाऱ्यावर काम करत आहेत,ह्ण असा थेट आरोप केळकर यांनी एका पत्राद्वारे केला आहे. केळकर यांनी २ मे रोजी मुख्यमंत्र्यांना हे पत्र लिहिले आहे. त्यात त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर व हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बड्या लोकांच्या गैरकारभाराविरोधात आवाज उठविणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांचा पोलिसांकडून छळ होत असल्याचे यात नमुद केले आहे.
या पत्रातून आमदार केळकर यांनी थेट पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना लक्ष्य करत त्यांचा पोलिसांवर कोणताही वचक नाही,ह्ण असे कळविले आहे. ह्यसिटिझन्स फोरम फॉर सॅनक्टिटी इन एज्युकेशनल सिस्टिमह्णचे प्रा. वैभव नरवडे यांना पोलिसांकडून होत असलेल्या त्रासाचा दाखला देऊन केळकर यांनी हे आरोप करत मुख्यमंत्र्यांकडे गाऱ्हाणे मांडले आहे. या फोरमच्या माध्यमातून राज्यातील काही शैक्षणिक संस्थातील गैरकारभाराचा पदार्फाश केला
होता. त्यांच्या या कामगिरीमुळे तब्बल २९ महाविद्यालयांना टाळे लागल्याचे केळकर यांनी ‘लोकमत’ला सांगितले. याप्रकारामुळे दुखावलेल्या शिक्षणसम्राटांनी पोलिसांना हाताशी धरून नरवडेंना खोट्या प्रकरणांत गुंतविण्याचा प्रयत्न करत आहेत. पोलीसही त्यांच्याच इशाऱ्यावर नाचत आहेत, असा केळकर यांचा आरोप आहे. तसेच नरवडे यांच्यावर पोलिसांनी दाखल केलेले खोटे
गुन्हे मागे घेण्याची मागणीही
त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली
आहे. (प्रतिनिधी)
पोलीस यंत्रणेची वस्तुस्थिती मांडली
राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा मुद्दा पुढे करून फडणवीस यांनी गृहखाते सोडावे अशी मागणी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून केली जात आहे. शिवसेनेनेही अनेकदा गृहखात्यावर टीका केली. आता भाजप आमदारानेच पोलिसांवर टीका केल्याने विरोधकांना बळ मिळण्याची शक्यता आहे. केळकर यांनी मात्र, मुख्यमंत्र्यांकडे गा-हाणे मांडले असून ही त्यांच्यावर टिका नसून पोलिस यंत्रणेचे जे काही सुरु आहे, त्याची वस्तुस्थिती मांडण्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले.