ऊसदरासाठी आता दिल्ली, नागपूर दिसत नाही का?
By Admin | Updated: November 10, 2014 04:18 IST2014-11-10T04:18:01+5:302014-11-10T04:18:01+5:30
उसाच्या दराबाबत निर्णय होण्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे नेते बारामतीत आंदोलन करीत असत. यावर्षी मात्र उसाच्या दरासंदर्भात ते मवाळ बनले आहेत.

ऊसदरासाठी आता दिल्ली, नागपूर दिसत नाही का?
श्रीगोंदा (जि. अहमदनगर) : उसाच्या दराबाबत निर्णय होण्यापूर्वीच शेतकरी संघटनेचे नेते बारामतीत आंदोलन करीत असत. यावर्षी मात्र उसाच्या दरासंदर्भात ते मवाळ बनले आहेत. आता संघटनावाल्यांना नागपूर, दिल्ली दिसत नाही का, असा थेट सवाल राष्ट्रवादीचे नेते माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
कुकडी सहकारी साखर कारखान्याच्या १२व्या गळीत हंगामाचा शुभारंभ पवारांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
ते म्हणाले की, यंदा उसाच्या
भावावर ‘स्वाभिमानी’वाल्यांनी तोंड उघडले नाही.
दरवर्षी ऊस तोडणी मजुरांच्या आंदोलनास जे खतपाणी घालत होते, तेच आता सत्तेत बसले आहेत, आणि शांत देखील आहेत. शिवाय ज्याचा उसाशी कोणताही संबंध अशा नेत्याला पुढे करण्याचा प्रयत्न एका संघटनेने सुरू केला, असा टोला त्यांनी राज ठाकरे यांना लगावला.
राज्यात त्रिशंकू स्थिती आहे. नि:स्वार्थ भावनेतून नवीन सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. एलबीटी, टोल बंदी, शेतीमालाला चांगले भाव, उसाचा एमआरपीनुसार भाव देण्यासाठी भाजपा सरकारला काही महिने मोकळेपणाने काम करू दिले पाहिजे. आम्ही केवळ विरोधासाठी विरोध करणार नाही, असा दावा त्यांनी केला. (प्रतिनिधी)