चिंता नको, छोटी संमेलने भरवा
By Admin | Updated: August 18, 2015 00:56 IST2015-08-18T00:56:13+5:302015-08-18T00:56:13+5:30
छोट्या साहित्य संमेलनातील चैतन्य पाहून मराठीविषयीची वाटणारी भीती अनाठायी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मराठीची चिंता न करता अशा साहित्य संमेलनांची

चिंता नको, छोटी संमेलने भरवा
जळगाव : छोट्या साहित्य संमेलनातील चैतन्य पाहून मराठीविषयीची वाटणारी भीती अनाठायी असल्याचे प्रकर्षाने जाणवते. त्यामुळे मराठीची चिंता न करता अशा साहित्य संमेलनांची आवश्यकता आहे, ती भरवत राहा, असे मत साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनी राज्यस्तरीय अकराव्या सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात व्यक्त केले.
मराठीचे युद्ध आपण हरलो, आता केवळ लढाई सुरू आहे. आज शिक्षणाचे माध्यम बदलले, मराठीवर मळभ आले आहे, असे वाटत असताना हे संमेलन म्हणजे आपण मराठीविषयी चुकीचा समज करून बसलो आहोत, असे स्पष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष वसंत आबाजी डहाके, माया धुप्पड, प्रभा गणोरकर, तारा भवाळकर, भगवान भटकर, संघपती दलुभाऊ जैन आदी मान्यवर संमेलनाला उपस्थित होते.
सूर्योदय सर्वसमावेशक मंडळातर्फे देण्यात येणारा अखिल भारतीय दलुभाऊ जैन मराठी साहित्य भूषण पुरस्कार दिब्रिटो यांना देण्यात आला. सूर्योदय साहित्य गौरव पुरस्कार तारा भवाळकर, तर सूर्योदय सेवा पुरस्कार प्रभा गणोरकर यांना प्रदान करण्यात आला.
छोटे संमेलन नवोदितांना आपले साहित्य सादर करण्याचे व्यासपीठ आहे. साहित्य जीवनाचा अविभाज्य घटक आहे. तो समाजाचा आरसादेखील असल्याचे माया धुप्पड यांनी उद्घाटनपर भाषणात सांगितले. (प्रतिनिधी)