हिंदू धर्माच्या अर्थाचा अनर्थ करू नका
By Admin | Updated: August 28, 2014 02:02 IST2014-08-28T02:02:21+5:302014-08-28T02:02:21+5:30
शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या हिंदू धर्माच्या अर्थाचा अनर्थ करू नका. हिंदू म्हणजे काय? याचा अभ्यास करा. हिंदुत्वाच्या व्याख्येला नुसती टीका करून सांप्रदायिक ठरविण्यापेक्षा त्याच्या खोलात

हिंदू धर्माच्या अर्थाचा अनर्थ करू नका
शरद पोंक्षे : ‘हिंदुत्व आणि शिवसेना’ विषयावर व्याख्यान
नागपूर : शिवसेनाप्रमुखांनी सांगितलेल्या हिंदू धर्माच्या अर्थाचा अनर्थ करू नका. हिंदू म्हणजे काय? याचा अभ्यास करा. हिंदुत्वाच्या व्याख्येला नुसती टीका करून सांप्रदायिक ठरविण्यापेक्षा त्याच्या खोलात जाऊन मानवतेच्या दृष्टीने या शब्दाकडे बघा, असा मोलाचा सल्ला प्रसिद्ध अभिनेते आणि वक्ते शरद पोंक्षे यांनी दिला.
शिवसेना जिल्हाप्रमुख शेखर सावरबांधे यांनी डॉ. हेडगेवार स्मृती परिसरातील महर्षी व्यास सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमात ‘हिंदुत्व आणि शिवसेना’ या विषयावर त्यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. याप्रसंगी विषयाची मांडणी करताना ते बोलत होते. स्वामी विवेकानंद आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी जे हिंदुत्व रेखाटले ते प्रत्यक्षात उतरविण्याचे कार्य बाळासाहेबांनी केले. त्याच चळवळीचे नाव शिवसेना आहे.
शिवसेना हा केवळ राजकीय पक्षच नाही तर समाजासाठी काम करणारा आणि समाजाची निकोपता हिंदुत्वनिष्ठेवर जपणारा पक्ष आणि एक चळवळ आहे. हिंदूंची व्याख्या फार व्यापक नाही. हिंदू हा फक्त धर्म नाही तर ती एक जीवनपद्धती आहे. हिंदू हा संस्कार आहे आणि या देशाच्या विविधतेत एकतेच्या सूत्राने बांधणारा धागा हिंदुत्व आहे.
पण काही लोक भ्रमित करण्याचा प्रयत्न करतात. आसेतु सिंधू हिमाचलापर्यंत अर्थात या देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात राहणारा नागरिक ज्याची श्रद्धा या देशात आहे, तो हिंदू आहे. यात प्रत्येकाला आपापल्या प्रार्थनापद्धतीचे स्वातंत्र्य आहे. हिंदू हा अतिशय साधा माणूस आहे. सौम्य आणि शांतताप्रिय असल्याने त्याचा घात होतो. त्यामुळेच केवळ स्वसंरक्षणासाठी बाळासाहेबांनी शिवसैनिकांना आक्रमकता शिकविली. अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा जास्त दोषी आहे, असे ते म्हणाले.
याप्रसंगी शरद पोंक्षे यांचा सत्कार शेखर सावरबांधे यांनी केला. तसेच राजे मुधोजी भोसले विश्व हिंदू परिषदेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर नियुक्त झाल्याबद्दल शहर शिवसेनेच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आ. आशिष जयस्वाल तर मंचावर राजे मुधोजी भोसले, रमेश बक्षी, चंद्रहास राऊत, किशोर कुमेरिया, मंगला गवरे, शीतल घरत, जगतराम सिन्हा, सूरज गोजे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन अनिल नगरारे यांनी तर अतिथींचे स्वागत हितेश यादव, नंदू थोटे, दीपक आदमने, गणेश डोइफोडे, प्रवीण गवरे, सुरेखा खोब्रागडे, अंजली देव, ज्योती होटे, कल्पना जोगे, कुसुम शिंदेकर यांनी केले. (प्रतिनिधी)