दौरे नकोत, पोटाला द्या भाकर !
By Admin | Updated: September 20, 2016 03:48 IST2016-09-20T03:48:03+5:302016-09-20T03:48:03+5:30
जिल्हा कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे.

दौरे नकोत, पोटाला द्या भाकर !
हितेन नाईक,
पालघर- जिल्हा कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न आता चांगलाच ऐरणीवर आला आहे. श्रमजीवी संघटनेचे शिष्टमंडळ आज जिल्हाधिकारी अभिजित बांगर यांना भेटले. जव्हार मोखाड्यात आता लोकांना रोजगाराची अत्यंत गरज असल्याचे या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिले. यावेळी पालघर जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी या देखील होत्या.
सागर वाघ च्या मृत्यू नंतर तब्बल १५ दिवसांनी सागरच्या कुटुंबाला भेटायला गेलेल्या आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांना मयत सागर च्या आईने अक्षरश: हाकलून दिले होते. त्यानंतर या प्रश्नाने सरकारवर चारी बाजूनी हल्लाबोल झाला होता. राज्याच्या दोन्ही सभागृहाचे विरोधी पक्षनेते तातडीने मोखाड्यात एकाच गावात एकाच वेळी भेटीला येण्याची ऐतिहासिक घटना घडली. याबाबत आता श्रमजीवी आंदोलनाच्या आक्र मकतेसोबत कृतीत देखील अधिक आक्र मक झाली आहे. १६ तारखेपासून श्रमजीवी संघटनेचे ३०० युवक कार्यकर्ते मोखाड्यातील गावागावात फिरून तेथील समस्या समजून घेत आहेत. गेल्या ३ दिवसात या युवकांनी केलेल्या सर्वेक्षणात लोकांनी सांगितले आम्हाला मंत्र्यांचे दौरे नको, हाताला काम आणि पोटाला भाकर हवी आहे. म्हणूनच श्रमजीवी चे संस्थापक विवेक पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली या युवक पथकाने रोजगार मागणीचे अर्ज देखील भरून घेतले. आणि आज हे अर्ज मोखाडा तहसीलदारांकडे सुपूर्द केले. याच अर्जाची तात्काळ दाखल घेऊन अतितातडीने प्रशासनाने रोहयो ची कामे सुरू करावी याबाबत या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. जिल्हाधिकारी अभिजित बांगर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी निधी चौधरी यांनी तात्काळ या बाबत संबंधितांना सूचना केल्या आणि शक्य तितक्या लवकर हि कामे सुरू करणार असल्याचे शिष्टमंडळाला सांगितले. येथिल आदिवासी, कातकरी बांधवांच्या घरात दोन दिवसाचेही खायला नसल्याची बाब श्रमजीवीच्या कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणू दिली. यावेळी याभागातील आदीवासी कातकरी कुटुंबाना तात्काळ अंत्योदय योजनेच्या शिधा पत्रिका देण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी सी तहसीलदार आणि पुरवठा विभागाला दिल्या. या शिष्टमंडळात श्रमजीवी संघटनेचे विजय जाधव, सुरेश रेंजड, प्रमोद पवार, ज्ञानेश्वर शिर्के, दिनेश पवार आणि इतर पदाधिकारी उपस्थित
होते. (वार्ताहर)