पावसाळ्याची वाट बघू नका, रस्ते दुरुस्ती करा
By Admin | Updated: January 31, 2015 05:23 IST2015-01-31T05:23:38+5:302015-01-31T05:23:38+5:30
पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़

पावसाळ्याची वाट बघू नका, रस्ते दुरुस्ती करा
मुंबई : पावसाळ्याची वाट न बघता रस्ते दुरूस्तीची कामे तत्काळ हाती घ्या, असे बजावत उच्च न्यायालयाने शुक्रवारी महापालिका व राज्य शासनाचे चांगलेच कान उपटले़
चांगले रस्ते व पायाभूत सुविधा देणे ही पालिका व शासनाची मुख्य घटनात्मक जबाबदारी आहे़ त्यामुळे केवळ पावसाळ्यातच खड्डे अधिक असतात, म्हणून तेव्हाच तत्परतेने काम करायचे हे पूर्णपणे गैर आहे, असे खडेबोलही न्यायालयाने यावेळी सुनावले़ तसेच यासाठी ठोस धोरण आखून त्याचा कृती अहवाल न्यायालयात सादर करा, असे आदेश देखील न्यायालयाने पालिकेला दिले आहेत़ खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल होत असल्याने या समस्येकडे न्यायालयाने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी विनंती करणारे पत्र न्या़ गौतम पटेल यांनी मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांना लिहिले होते़ त्याची दखल घेत न्यायालयाने मुंबईतील खड्ड्यांचा मुद्दा सुनावणीसाठी सुओमोटो जनहित याचिका म्हणून दाखल करून घेतला़ यावरील सुनावणीत गेल्यावर्षी न्यायालयाने चांगले रस्ते करण्यासाठी ठोस धोरण आखण्याचे आदेश पालिकेला दिले होते़
मात्र, पालिकेने रस्त्यांवरील खड्ड्यांच्या तक्रारी केवळ पावसाळ्यातच येत असतात़ तेव्हा त्याची दखल घेतली जाते, असे न्यायालयाला सांगितले़ पण खड्ड्यांसाठी पालिकेची वेबसाईट वर्षभर कार्यरत असते, असे शासनाने न्यायालयात स्पष्ट केले़
तसेच अॅड़ रूजू ठक्कर यांनी सध्या रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणले़ सध्या मुलुंडहून दक्षिण मुंबईत येण्यासाठी किमान दोन तास लागतात़ कारण या मार्गावर रस्त्यांची कामे सुरू आहेत़ तेव्हा याबाबत न्यायालयाने योग्य ते आदेश द्यावेत, अशी मागणी अॅड़ ठक्कर यांनी केली़
त्यावर न्यायालयाने शासन व पालिकेला चांगलेच फैलावर घेतले व याबाबत ठोस धोरण आखण्याचे निर्देश दिले़ (प्रतिनिधी)