वसतिगृहातील चार तरुणींचा शोध लागेना़ !
By Admin | Updated: May 16, 2015 02:52 IST2015-05-16T02:52:59+5:302015-05-16T02:52:59+5:30
शहरातून २० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चार तरुणींचा तपास अद्यापही लागलेला नाही़ वसतिगृहचालक व प्रशासकीय अधिकारी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्याचे सांगत आहेत़

वसतिगृहातील चार तरुणींचा शोध लागेना़ !
पंकज जैस्वाल , लातूर
शहरातून २० दिवसांपूर्वी बेपत्ता झालेल्या चार तरुणींचा तपास अद्यापही लागलेला नाही़ वसतिगृहचालक व प्रशासकीय अधिकारी याबाबत पोलिसांकडे तक्रार केल्याचे सांगत आहेत़
लातूरच्या एमआयडीसीतील ‘उज्ज्वला प्रकल्प’ या वसतिगृहामधून २६ एप्रिलच्या पहाटे २२ ते ३० वर्षे वयोगटातील ४ तरुणी गायब झाल्या़ त्या नाशिक, पुणे-नगर रोडवरील सिकंदरपूर, लातूर व कोलकाता येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले़ या प्रकरणी वसतिगृहाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे़; तर पोलिसांनी गायब झालेल्या तरुणींच्या घराचे पत्ते शोधून तेथे चौकशी केली असता, त्या घरीही परतल्या नसल्याचे कळते.
वसतिगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत जिल्हा प्रशासनाने सुरक्षेची पाहणी करावी, अशी मागणी महिला बाल आयोगाच्या सदस्या आशाताई भिसे यांनी केली आहे.
‘उज्ज्वला प्रकल्प’ मागास जनसेवा समितीद्वारे चालविले जाते़ तेथे सध्या ४० मुलींचे वास्तव्य असून, त्यापैकी ४ मुली २६ एप्रिलच्या पहाटे २ वाजेपासून बेपत्ता आहेत़ वसतिगृहातील स्वच्छतागृह व स्नानगृहाची खिडकी फोडून बाहेरील पत्र्यांवर उतरून त्या पळाल्याचे सांगण्यात येते.