ऊठसूठ आंदोलनं करू नका !

By Admin | Updated: September 10, 2014 03:01 IST2014-09-10T03:01:38+5:302014-09-10T03:01:38+5:30

केंद्रात मोठ्या कष्टाने आपले सरकार आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा

Do not rush up! | ऊठसूठ आंदोलनं करू नका !

ऊठसूठ आंदोलनं करू नका !

मुंबई : केंद्रात मोठ्या कष्टाने आपले सरकार आले आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे काही प्रश्न असतील तर चर्चा करा. परंतु पहिल्या दिवसापासून आंदोलन करून वातावरण बिघडवू नका, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांना कानपिचक्या दिल्या. तर कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये दलाली खाऊन बेसुमार नफा कमावणाऱ्या दलालांवर कारवाई करणारा कायदा करण्याचा केंद्र सरकार विचार करीत असल्याची माहिती विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी दिली.
कांद्याचे दर कमी झाल्याने निर्यात अनुदान द्यावे तसेच आयात थांबवावी या मागणीकरिता शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु झाले आहे. याकडे ठाकरे यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सारखी सारखी आंदोलन करणे योग्य नाही. आपण आज केंद्रात सत्तेत असून उद्या राज्यातही सत्तेत येऊ. परंतु चर्चेने प्रश्न सोडवले पाहिजेत. ते जर सुटले नाहीत तर आंदोलन करा. केंद्रातील मोदी सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यकाळात अनेक गोष्टींचा पाया रचला गेला आहे. सरकार म्हणजे काही अर्ध्या तासाच पिझ्झाची डिलीव्हरी नाही, असेही ते म्हणाले.
दरम्यान, केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह हे जळगावच्या दौऱ्यावर होते. तेथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांची भेट घेतली. सरकार या नात्याने आम्हाला जसे शेतकऱ्यांचे हित पाहायचे आहे तसेच ग्राहकांचे हित देखील पाहणे गरजेचे आहे, असे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्यांना सांगितले. शेतकरी व व्यापारी यांच्यातील दलाल बेसुमार नफा कमावत असून त्याला पायबंद घालणाऱ्या तरतुदी कायद्यात नाहीत. त्यामुळे केंद्र सरकार कायद्यात सुधारणा करणार असल्याचे केंद्रीय कृषिमंत्र्यांनी शेतकऱ्यांना सांगितल्याकडे खडसे यांनी लक्ष वेधले.

Web Title: Do not rush up!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.