उद्धव भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नका
By Admin | Updated: November 19, 2014 04:52 IST2014-11-19T04:52:44+5:302014-11-19T04:52:44+5:30
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला काही कारणामुळे जाता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या स्मृतिदिनाला गेलो.

उद्धव भेटीचा कुणीही राजकीय अर्थ काढू नका
पुणे : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पहिल्या स्मृतिदिनाला काही कारणामुळे जाता आले नाही. त्यामुळे दुसऱ्या स्मृतिदिनाला गेलो. उद्धव ठाकरे उपस्थित असल्याने त्यांची भेट झाली. त्याचा अजिबात राजकीय अर्थ काढू नये, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी स्पष्ट केले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिनानिमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव व राज ठाकरे सोमवारी दादरच्या शिवाजी पार्क येथे एकत्र आले होते. त्यामुळे शिवसेना व मनसे एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र, राज यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत नव्या राजकीय समीकरणाविषयी नकार दिला. ते म्हणाले, माझी मुलगी उर्वशी आजारी असताना उद्धव हॉस्पिटलमध्ये आले होते. त्याही वेळी आमची भेट झाली. त्यानंतर स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर भेट झाली. अशा ठिकाणी आम्ही राजकीय चर्चा कशी काय करणार? कार्यकर्त्यांच्या भावना आणि
भावांचा विषय वेगळा असतो, अशी टिप्पणीही त्यांनी केली.
सद्य:स्थितीत सत्ताधारी कोण व विरोधक कोण, हे कळत नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी
विचित्र स्थिती पहिल्यांदाच पाहायला मिळत आहे. आवाजी मतदानाने बहुमत सिद्ध होऊ शकत नाही. लोकांनी मतदान करून निवडून दिले. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी मतदान झाले पाहिजे. ‘आवाजी’च्या नावाखाली कार्पेटखाली कचरा
ठेवून केवळ कार्पेट दाखविणे चुकीचे आहे. जाहीर मतदानातून
मतांचे विभाजन कळते. मात्र, गुप्त मतदानात घोडेबाजार होतो. त्यामुळे बहुमत सिद्ध करण्यासाठी उघड मतदान झाले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. (प्रतिनिधी)