पुनर्वसन नको, हक्काची घरे वाचवा
By Admin | Updated: July 11, 2017 00:28 IST2017-07-11T00:28:09+5:302017-07-11T00:28:09+5:30
रिंगरोड प्रकल्पामध्ये घरे जाणाऱ्या बाधितांनी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलने सुरू केली आहेत.

पुनर्वसन नको, हक्काची घरे वाचवा
लोकमत न्यूज नेटवर्क
रावेत : रिंगरोड प्रकल्पामध्ये घरे जाणाऱ्या बाधितांनी घर बचाव संघर्ष समितीच्या वतीने मागील काही दिवसांपासून विविध प्रकारे आंदोलने सुरू केली आहेत. त्याचाच भाग म्हणून नागरिकांनी आपली हक्काची घरे वाचविण्यासाठी रविवारी चिंचवडेनगर येथील दगडोबा चौकात मुख्यमंत्र्यांना पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सत्तारूढ पक्ष नेते एकनाथ पवार आंदोलकांशी बोलताना ‘रिंगरोड प्रकल्प रद्द नाही झाला तर ज्यांची घरे जातील त्यांचे आम्ही पुनर्वसन करू’, असे वक्तव्य केल्यामुळे आंदोलक गोंधळ घालत आक्रमक झाले. या वेळी परिस्थिती पाहता उपस्थित लोकप्रतिनिधींना तेथून काढता पाय घ्यावा लागला होता.
घर बचाव संघर्ष समितीच्या पोस्टकार्ड पाठवा आंदोलनाला मार्गदर्शन करण्याकरिता प्रथमच सत्तारूढ पक्षनेते आणि आमदार उपस्थित राहिले याचा आम्हाला आनंद वाटला़ ते आम्हाला योग्य ते मार्गदर्शन करून यशस्वी मार्ग काढतील अशी आम्हाला अपेक्षा होती. परंतु भाजपाच्या नेत्यांनी नकारात्मक भूमिका दर्शविल्यामुळे आंदोलकांच्या भावनेचा उद्रेक झाला. मात्र सत्ताधाऱ्यांच्याच भूमिकेमुळे आज गोंधळ निर्माण झाला. उलट पवार यांनी आम्ही तुमच्या घराच्या विटेलाही धक्का लागू देणार नाही, अशी भूमिका घ्याला हवी होती.
- विजय पाटील, समन्वयक घर बचाव संघर्ष समिती
आमची घरे कोणत्याही परिस्थितीत तोडता कामा नये. नेत्यांनी आमच्या घरांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी. अगोदर रिंगरोडचे आरक्षण रद्द करा व आमची घरे वाचवा. आजच्या आंदोलनात पालिकेत सत्तेत असणाऱ्या सताधाऱ्यांनी केलेल्या वक्तव्याचा आम्ही बाधित नागरिक जाहीर निषेध करीत आहोत.
- हंसराज चिघळीकर, रिंगरोड बाधित नागरिक, बिजलीनगर
घर म्हणजे आमच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असून आमच्या घरांवर कुऱ्हाड आणून विकास साधायचा असेल तर या विकासाला आमचा विरोध आहे. आमच्या घरांचा प्रश्न नेत्यांनी काढू नये. आम्हाला आहे त्या ठिकाणी आहे तसे राहू द्या. आम्हाला पुनर्वसन नको. आम्ही आमचे आंदोलन अहिंसेच्या मार्गाने करीत असताना आमच्या भावना भडकविण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचा आम्ही तीव्र निषेध करतो.
- रेखा भोळे, पदाधिकारी घर बचाव संघर्ष समिती
लोकांनी विश्वासावर निवडून देऊन सत्ताबदल केला. हेच आज आमचा विश्वासघात करीत आहेत. त्यांचा आम्ही निषेध करीत आहोत. कोणत्याही परिस्थितीत आमची घरे वाचली पाहिजेत. आम्हाला पुनर्वसन नको. जोपर्यंत आम्हाला योग्य तो न्याय मिळत नाही तोपर्यंत संघर्ष करणारच.
- अमर मुलगे, बाधित नागरिक, बिजलीनगर
सत्ताधाऱ्यांच्या आजच्या वाक्त्व्याचा आम्ही जाहीर निषेध करतो. आम्हाला त्यांची घरे नकोत़ आम्हाला आमची हक्काची घरे वाचली पाहिजेत. त्यासाठी प्रशासनाने आमच्या घरावर असणारा प्राधिकरणाचा शिक्का काढून सातबाऱ्यावर आमची नोंद करावी. आमची घरे वाचली पाहिजेत व प्रस्तावित रिंगरोड रद्द झाला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी विरोधक असताना अनधिकृत घरांबाबत दिलेला शब्द पाळावा.
- धनाजी येळेकर, बाधित नागरिक, थेरगाव