साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका - मुख्यमंत्री
By Admin | Updated: April 5, 2015 20:13 IST2015-04-05T20:06:41+5:302015-04-05T20:13:07+5:30
साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका, मगच मराठी साहित्याचा रथ अविरत पुढे जाऊ शकेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.

साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका - मुख्यमंत्री
>ऑनलाइन लोकमत
घुमान (पंजाब), दि. ५ - जगात सर्वाधिक बोलल्या जाणा-या १५ भाषांमध्ये मराठीचा समावेश असून मराठी साहित्य संमेलनात जे विचार व संस्कृतीची झलक पाहायला मिळते ते इंग्रजी साहित्य संमेलनांमध्ये पाहायला मिळत नाही. अशा या साहित्य संमेलनाचे राजकारण करु नका, मगच मराठी साहित्याचा रथ अविरत पुढे जाऊ शकेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.
घुमान येथे सुरु असलेल्या साहित्य संमेलनाची रविवारी सांगता झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रेल्वे मंत्री सुरेश प्रभू, राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते. पुढील वर्षापासून दरवर्षी दस-यापूर्वी संमेलनासाठीचा निधी साहित्य महामंडळाच्या खात्यात जमा असेल असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सध्या महाराष्ट्रात १५० हून अधिक प्रकारची साहित्य संमेलन होतात. आता राजकारण्यांचे साहित्य संमेलन होऊ नये व साहित्य संमेलनाचेही राजकारण होऊ नये. नवीन उर्जा निर्माण करणा-या संत पंरपरेला सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे काम साहित्यिकांना करावे लागेल असे फडणवीस यांनी नमूद केले. पंजाब सरकारने मराठी साहित्य संमेलनासाठी सहकार्य केले यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंजाब सरकारचे आभार मानले. तसेच पुढील वर्षीचे पंजाबी साहित्य संमेलन महाराष्ट्रात भरवावे अशी विनंतीही त्यांनी पंजाब सरकारला केली. साहित्य नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी मराठी भाषेला आधुनिकतेशी जोडावे लागेल असेही त्यांनी सांगितले. संमेलनाध्यक्ष सदानंद मोरे यांच्या भाषणाने साहित्य संमेलनाचे सूप वाजले.
संमेलनात मंजूर झालेले ठराव
> मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन व समारोप कार्यक्रमाचे आकाशवाणी व दुरदर्शनवर थेट प्रक्षेपण करा,
> घुमान मराठी साहित्य संमेलनातील महत्त्वाचे ठराव, घुमानचे नामकरण 'बाबा नामदेव घुमान नगरी' असे करण्याची मागणी, पंढरपूर ते घुमान नामदेव एक्सप्रेस सुरु करावी.
> घुमान येथील मराठी साहित्य संमेलनात कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येच्या निषेधाचा ठराव मंजूर.