सीमेवरील संघर्षाचे राजकारण करू नका - मोदींचा पवारांना इशारा
By Admin | Updated: October 9, 2014 17:52 IST2014-10-09T16:04:47+5:302014-10-09T17:52:22+5:30
भारत-पाकिस्तान यांच्यात सीमेवर होत असलेल्या संघर्षाचे राजकारण करू नका असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिला आहे.

सीमेवरील संघर्षाचे राजकारण करू नका - मोदींचा पवारांना इशारा
>ऑनलाइन लोकमत
बारामती, दि. ९ - केंद्रीय संरक्षणमंत्री असताना कधी सीमेवर गेला होतात का? असा प्रश्न उपस्थित करीत भारत-पाकिस्तान यांच्यात सीमेवर होत असलेल्या संघर्षाचे राजकारण करू नका असा थेट इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांना दिला आहे.
पंतप्रधान मोदी यांची गुरूवारी शरद पवार यांचा बालेकिल्ला असलेल्या बारामतीत प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी सीमेवरील संघर्षाचे राजकारण करणा-या शरद पवार यांना थेट प्रश्न विचारला. तुम्ही केंद्रात संरक्षणमंत्री होता. त्यावेळी सुध्दा पाकिस्तान आणि चीनकडून गोळीबार होत होता. परंतू तुम्ही कधी सीमेवर गेला आहात का? असा प्रश्न विचारला. सरकार येतील व जातील परंतू राज्यकर्त्यांनी सैनिकांचे मनोबल खचतील असे बोलू नये असे मोदी यांनी टीका करणा-या नेत्यांना आवाहन केले. सीमेवर पाकिस्तानकडून होत असलेल्या गोळीबारावर मोदींना लक्ष्य करीत शरद पवार, राहुल गांधी, उध्दव ठाकरे, राज ठाकरे आदींनी मोदी यांच्यावर प्रचारसभेत टीका केली होती.
या सभेत बोलताना मोदींनी प्रारंभीच काका-पुतण्या असा उल्लेख करीत अजित पवार आणि शरद पवार यांना लक्ष्य केले. देशाला स्वातंत्र्य मिळाले परंतू बारामतीकरांना अद्याप स्वातंत्र्य मिळाले नाही. येत्या १५ ऑक्टोबरला बारामतीकरांसाठी स्वातंत्र्यांचा दिवस असेल असे मोदी म्हणाले. निवडणुकीनंतर काका-पुतण्याचे काय होणार? असे सांगून बारामतीमधील खेडयापाडयात आजही पिण्याचे पाणी मिळत नाही. राष्ट्रवादीच्या घडयाळाची टिक-टिक बंद होणार असून दहा वर्षात दहापट भ्रष्टाचार केल्याचे राष्ट्रवादीची घडयाळ सांगते अशी टीका मोदी यांनी राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर केली. धनगर समाजाने केलेल्या विशेष सत्काराबद्दल मोदी यांनी धनगर समाजाचे यावेळी आभार मानले.