विजेसाठी जिवाशी खेळू नका
By Admin | Updated: October 12, 2014 23:33 IST2014-10-12T23:24:19+5:302014-10-12T23:33:26+5:30
उद्धव ठाकरे : सूर्यकांत दळवींच्या प्रचारसभेत पुन्हा एकदा जैतापूर प्रकल्पाला ठाम विरोध

विजेसाठी जिवाशी खेळू नका
दापोली : केवळ दोन टक्के विजेसाठी इथल्या जिवांशी शंभर टक्के खेळणार आहात का, असा प्रश्न करून शिवसेनेचे कार्यकारी प्रमुख उध्दव ठाकरे यांनी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध आहे व राहील, याचा पुनरूच्चार केला.
शिवसेनेचे उमेदवार सूर्यकांत दळवी यांच्या प्रचारार्थ शहरातील आझाद मैदानातील जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेस आघाडीपाठोपाठ भाजपवर टीकास्त्र सोडताना ठाकरे म्हणाले की, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला आहे. महाराष्ट्राची अस्मिता मोठी आहे. मात्र, राज्याचा मुख्यमंत्री दिल्लीच्या नेतृत्त्वाचा जर सेवक म्हणून राहणार असेल, त्यांच्यापुढे गुडघे टेकून नतमस्तक होणार असेल तर महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता हे कदापी सहन करणार नाही. राज्याला अतिउच्च शिखरावर नेण्यासाठी राज्याचा मुख्यमंत्री कोण, हे दिल्ली ठरवणार नसून, राज्यातील जनताच ठरवेल, असेही ते म्हणाले.
केवळ साडेचार वर्षांचा अपवादवगळता तब्बल ६० वर्षे राज्यातील काँग्रेस आघाडी शासनाने जनतेचे शोषण केले आहे. जनतेच्या पैशावर काँग्रेसचे पुढारी काही साखरसम्राट, तर काही सत्कारसम्राट झाले. मात्र, माझा सर्वसामान्य गरीब माणूस जागेवरच राहिला. दारिद्र्याच्या खाईत लोटला गेला. या सामान्य माणसाला सम्राट बनवण्याचे स्वप्न आपण पाहात आहोत. राज्यातील गोरगरीब जनतेचा आर्थिक स्तर उंचावयाचा असेल तर आपले मत बळकट करा, असे आवाहनही त्यांनी केले.
रत्नागिरीच्या जाहीर सभेत जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला असलेला शिवसेनेचा जाहीर विरोध प्रकट करतानाच दापोलीतीलही सभेत त्यांनी जैतापूरच्या विषयाला हात घातला. ते म्हणाले की, या प्रकल्पात निर्माण होणारी वीज इतर राज्यांना विकली जाणार आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला यातील २ टक्के वीज मिळणार आहे. केवळ २ टक्के विजेसाठी आपण येथील जनतेच्या जिवाशी कोणालाही खेळू देणार नाही. हा प्रकल्प एवढाच चांगला असेल तर तो गुजरातला जरूर न्यावा, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. या सभेत जैतापूरच्या मुद्द्यावर त्यांनी प्रखर विरोध दशर्विला.
सभेच्या सुरुवातीला सूर्यकांत दळवी यांचेही भाषण झाले. तत्पूर्वी खेडचे सभापती अण्णा कदम, राजेंद्र निगुडकर, जिल्हाध्यक्ष सचिन कदम यांची भाषणे झाली. यावेळी दापोली विधानसभा क्षेत्रप्रमुख संदीप राजपुरे, गुहागर येथील उमेदवार विजय भोसले, मंडणगडचे तालुकाध्यक्ष संतोष घोसाळकर, दापोलीचे उपतालुकाप्रमुख उदय जावकर, जिल्हा परिषद सदस्या स्मिता जावकर, प्रकाश कालेकर, पंचायत समिती सभापती गीतांजली वेदपाठक, उपसभापती उन्मेश राणे, पंचायत समिती सदस्य श्रीपत पवार, नीलेश शेठ, माजी उपसभापती घडशी, प्रवीण घाग, अनंत वाजे उपस्थित होते. ऋषिकेश गुजर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
कदमांसह अनेकांची दांडी
शिवसेना नेते रामदास कदम, माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, दापोलीचे माजी तालुकाप्रमुख प्रदीप सुर्वे, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र फणसे सभेला हजर नव्हते. त्यामुळे शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा स्पष्टपणे पुढे आली.