अध्यादेश नको, विधेयक आणा
By Admin | Updated: September 10, 2014 03:36 IST2014-09-10T03:36:06+5:302014-09-10T03:36:06+5:30
नांदेड येथील हजूर सचखंड गुरुद्वाराचा कारभार पाहणासाठी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यानंतर त्यासाठीचा अध्यादेश काढण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली होती

अध्यादेश नको, विधेयक आणा
मुंबई : नांदेड येथील हजूर सचखंड गुरुद्वाराचा कारभार पाहणासाठी मंडळाची स्थापना करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतल्यानंतर त्यासाठीचा अध्यादेश काढण्याची विनंती राज्यपालांना करण्यात आली होती. तथापि, राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी अध्यादेश काढण्यास नकार देत सर्वसमावेशक असे विधेयक विधिमंडळात मंजूर करण्यास राज्य शासनाला सांगितले आहे. त्यामुळे आता हे गुरुद्वारा मंडळ लगेच स्थापन होण्याची शक्यता नाही. त्यासाठी आता नागपूरच्या विधिमंडळ अधिवेशनात नवीन सरकारमध्ये विधेयक मंजूर होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
गेल्याच आठवड्यात राज्य निवडणूक आयुक्तपदावर जे.एस. सहारिया यांची नियुक्ती करण्याची शिफारस मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यपाल राव यांच्याकडे केली असता राज्यपालांनी ती परत पाठवित राज्य मंत्रिमंडळाने सहारिया यांच्या नावाची शिफारस आपल्याकडे करावी, असे बजावले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिफारस करून राज्यपालांकडे ती पाठविण्यात आली. तेव्हा कुठे राज्यपालांनी सहारिया यांच्या नियुक्तीला हिरवा झेंडा दाखविला. मात्र, यानिमित्ताने राज्यपाल व शासनात वादाची पहिली ठिणगी पडली होती.
आता नांदेडच्या गुरुद्वाराच्या निमित्ताने पुन्हा वाद निर्माण झाला आहे. मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत त्याचे पडसाद उमटले. राज्यपाल पक्षपाती भूमिका घेत आहेत, अशी टीका काही मंत्र्यांनी केली. या विषयावर वाद न करण्याची भूमिका ज्येष्ठ मंत्र्यांनी मांडली आणि अध्यादेशाचा आग्रह न धरता विधिमंडळाच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणावे, असे ठरविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. (विशेष प्रतिनिधी)