रेल्वे यंत्रणाच नापास
By Admin | Updated: July 14, 2014 03:42 IST2014-07-14T03:42:32+5:302014-07-14T03:42:32+5:30
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला.

रेल्वे यंत्रणाच नापास
सुशांत मोरे, मुंबई
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेनला मे महिन्यात मोठा अपघात झाला आणि या अपघातानंतर रेल्वे प्रवासी सुरक्षिततेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला. या अपघाताची चौकशी करणाऱ्या रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्ड आणि मध्य रेल्वे महाव्यवस्थापकांना सादर केला आहे. या अहवालात रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास आणि अयशस्वी झाल्याचे नमूद केले आहे.
दिवा-सावंतवाडी पॅसेंजर ट्रेन अपघातात २२ प्रवासी ठार तर शेकडो प्रवासी जखमी झाले. हा अपघात रेल्वे रुळाला तडा गेल्यानेच झाला असावा असा प्राथमिक अंदाज रेल्वेने वर्तविला आहे. त्याबाबतचा रेल्वेच्या आरडीएसओकडून अहवाल येणे बाकी आहे. तत्पूर्वी मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांच्याकडून अपघाताची चौकशी केली जात होती. अपघात नेमका कसा झाला, त्याचे मूळ कारण काय हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. महत्त्वाची बाब म्हणजे ज्या ठिकाणी हा अपघात झाला ते ठिकाण मध्य रेल्वेच्या अखत्यारीत आहे; तर अपघातग्रस्त ट्रेनच्या देखभाल आणि दुरुस्तीचे काम हे कोकण रेल्वेकडून केले जात होते. त्यामुळे या बाजूदेखील रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून पडताळून पाहिल्या जात होत्या.
मध्य रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून एक आठवड्यापूर्वीच या अपघाताचा प्राथमिक अहवाल रेल्वे बोर्डाचे महाव्यवस्थापक आणि मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना सादर करण्यात आला आहे. या अहवालात त्यांनी रेल्वेच्या यंत्रणेवरच ठपका ठेवताना ती नापास झाल्याचे नमूद केले आहे. रेल्वे सुरक्षा आयुक्त चेतन बक्षी यांनी सांगितले की, मुळात यंत्रणाच सक्षम नसल्यामुळे हा अपघात झाला. अपघातग्रस्त बोगीबरोबरच रेल्वे रुळाची देखभाल आणि दुरुस्तीही बरोबर झालेली नव्हती.