चूक खपवून घेणार नाही
By Admin | Updated: May 21, 2016 05:59 IST2016-05-21T05:57:22+5:302016-05-21T05:59:21+5:30
ठाणे विधान परिषदेसाठी प्रथमच अटीतटीची लढत होणार असून, राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे आणि शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक रिंगणात उतरले

चूक खपवून घेणार नाही
ठाणे : ठाणे विधान परिषदेसाठी प्रथमच अटीतटीची लढत होणार असून, राष्ट्रवादीकडून वसंत डावखरे आणि शिवसेनेतर्फे रवींद्र फाटक रिंगणात उतरले आहेत. फाटक यांना उमेदवारी देण्यावरून नाराज झालेल्यांची मनधरणी करण्यात पक्षप्रमुखांना काहीसे यश आले असल्याचा दावा पक्षातून केला जात आहे. परंतु, आता कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असल्याचे फर्मानच शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काढले आहे. या निवडणुकीत थोडीही चूक खपवून घेतली जाणार नसल्याचा इशाराही त्यांनी आमदार आणि नगरसेवकांना दिला आहे. त्यामुळे प्रथमच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे दिसत आहे. विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या एका जागेसाठी येत्या ३ जून रोजी निवडणूक होणार असून, मतमोजणी ६ जूनला होणार आहे. त्यानुसार, या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतर्फे डावखरे पाचव्यांदा रिंगणात असून, त्यांना प्रथमच शिवसेनेने कडवी झुंज देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी फाटक यांना उमेदवारी दिली आहे. परंतु, या उमेदवारीसाठी इच्छुक असलेली काही मंडळी मात्र भलतीच नाराज झाली होती. त्यामुळे त्यांची कानउघाडणी करण्यासाठी मंगळवारी ह्यमातोश्रीह्णवर खासदार, आमदार, नगरसेवकांची एक बैठक घेण्यात आल्याची माहिती शिवसेनेच्या सूत्रांनी दिली. या बैठकीत नाराजांची चांगलीच कानउघाडणी केल्याचेही सूत्रांनी सांगितले. नाराजी विसरून एकदिलाने या निवडणुकीसाठी सामोरे जाण्याचे आदेश पक्षप्रमुखांनी दिले आहेत. कोणत्याही परिस्थितीत ही निवडणूक जिंकायची असल्याने छोटी चूकही माफ करणार नसल्याचा इशारा त्यांनी सर्व नगरसेवक आणि आमदारांना दिला आहे. ह्यमातोश्रीह्णनेच आता फर्मान काढल्याने नाराजदेखील प्रचारात उतरले आहेत. भाजपाच्या श्रेष्ठींनीदेखील त्यांच्या नगरसेवकांना एकदिलाने काम करण्याचा सल्ला दिला आहे. दोन दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेदेखील स्वत: प्रचारात उडी घेणार असल्याने पहिल्यांदाच ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरणार असल्याचे दिसत आहे.
>अपक्षांचे भाव वधारले सध्याचे संख्याबळ पाहता राष्ट्रवादीकडे १९९, काँग्रेसकडे १०३ आणि बहुजन विकास आघाडीकडे ११९ असे ४२१ मतांचे बळ डावखरेंकडे आहे. तर, शिवसेना ३११, भाजपा १८० अशी ४९१ मते युतीने जुळवून आणली आहेत. उरलेल्या मतांमध्ये रिपाइंचे ८, अपक्ष ४८, मनसे २०, बसपा ५, सपा १७, एमएमआय १, कोणार्क विकास आघाडी ७, सेक्युलर अलायन्स आॅफ इंडिया ४ आणि डाव्यांची ५ मते आहेत. ही संख्या ११९च्या घरात जात असून, हीच मते निर्णायक ठरणार असल्याने त्यांचा भाव वधारला आहे. मते फोडाफोडीला ऊत येऊ लागल्याने इतर पक्षांचेही भाव वधारण्याची चिन्हे आहेत.
प्रचाराला सुरुवात : राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत डावखरे यांची उमेदवारी सहा महिन्यांपूर्वीच निश्चित झाल्याने त्यांनी प्रचारात सध्यातरी आघाडी घेतली आहे. परंतु, आता फाटक यांच्या प्रचारासाठी आमदार आणि खासदारदेखील सरसावले असून, प्रत्येक ठिकाणच्या आमदार, खासदार आणि नगरसेवकांना श्रेष्ठींनी जबाबदारी वाटून दिली आहे.
> डावखरे-फाटक यांच्यातच लढत
विधान परिषदेच्या ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या एका जागेसाठी आलेल्या तीन उमेदवारी अर्जांपैकी राजेश मोरे यांनी शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे महायुतीचे अधिकृत उमेवार रवींद्र फाटक व राष्टÑवादी-काँग्रेसचे वसंत डावखरे यांच्यातील लढतीचा मार्ग मोकळा झाला. तर, दुसरीकडे निवडणुकीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासह संभाव्य घोडेबाजार रोखण्यासाठी निवडणूक विभागासह पालघर, ठाणे आणि नवी मुंबई पोलिसांकडून विशेष दक्षता घेण्यात येत आहे. निवडणुकीच्या कालावधीत कायदा व सुव्यवस्था चोख ठेवण्यासाठी जिल्ह्यात १६ दिवसांपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सुव्यवस्था जोपासण्यासाठी घोडेबाजारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. निवडणूक कार्यक्षेत्रात रहदारीस अडथळा होईल किंवा उजेड व हवा निर्वेधपणे येण्यास प्रतिबंध होईल, अशा रीतीने कोणत्याही सार्वजनिक रस्ता व सार्वजनिक जागेवर बॅनर्स लावणे, फलक लावणे, खांबावर झेंडे लावण्यास निवडणूक प्रक्रिया संपेपर्यंतच्या कालावधीसाठी मनाई आदेश जारी केला आहे. या मनाई आदेशाचा भंग करणाºयांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.