आत्महत्या करून मुलांना अनाथ करू नका!

By Admin | Updated: June 30, 2016 01:14 IST2016-06-30T01:13:38+5:302016-06-30T01:14:43+5:30

‘आत्महत्या करून मुलांना अनाथ करू नका’, ‘संकटांना धिराने सामोरे जा, खचून जाऊ नका’ असे फलक हातात धरलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

Do not make the children orphaned by suicide! | आत्महत्या करून मुलांना अनाथ करू नका!

आत्महत्या करून मुलांना अनाथ करू नका!


पुणे : ‘आत्महत्या करून मुलांना अनाथ करू नका’, ‘संकटांना धिराने सामोरे जा, खचून जाऊ नका’ असे फलक हातात धरलेल्या चिमुकल्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. विदर्भ, मराठवाड्यातील आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचीच मुले दिंडीमध्ये सहभागी होऊन आत्महत्या करू नका, अशी कळकळीची विनवणी वारकऱ्यांना तसेच आलेल्या भाविकांना करीत होती. त्यांची ही निरागस हाक ऐकून उपस्थितांची मने हेलावून गेली.
पाटील इस्टेट येथील उड्डाणपुलाखाली चौकात महापालिकेच्या वतीने वारकऱ्यांचे स्वागत करण्यात होते. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांची दिंडी चौकात येताच महापौर प्रशांत जगताप लगेच स्टेजवरून खाली उतरले. दोन चिमुकल्या मुलींना त्यांनी उचलून घेतले. त्यांची आत्मीयतेने विचारपूस केली. या मुलांच्या दिंडीमध्ये अगदी तीन ते चार वर्षांच्या चिमुकल्यापासून किशोरवयीन मुला-मुलींचा समावेश होता. पांढरेशुभ्र कपडे त्यांनी परिधान केले होते. कपाळावर टिळा लावलेला होता. त्यांच्या हातातील फलकांमुळे सगळ्यांचे लक्ष लगेच त्यांच्याकडे वेधले जात होते. त्या फलकावरील ‘आत्महत्या करून, मुलांना अनाथ करू नका’ हे वाक्य वाचून मन कासावीस होत होते. कारण ज्यांच्या वाट्याला हे भोग आले आहेत, तीच मुले ही विनवणी करीत होती. महापौरांनी खाली उतरून या मुलांना उचलून घेतल्यानंतर फोटो घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींची एकच झुंबड उडाली. त्यानंतर ही दिंडी मनाला चटका लावूनच मुक्कामाच्या ठिकाणाकडे मार्गस्थ झाली.
दुष्काळ, नापिकीला कंटाळून विदर्भ, मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. शेतकऱ्यांचा आत्महत्येचा मोठा फटका त्यांच्या मुलांना सहन करावा लागत आहे. वडिलांचे छत्र अचानक हरपल्यामुळे त्यांच्यावर मोठा बाका प्रसंग ओढावला आहे. या मुलांचे शिक्षण, वसतिगृहाची सुविधा यासाठी काही संस्था-संघटना पुढे आल्या आहेत. त्यांच्याकडून त्यांना सर्वतोपरी मदत देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मात्र, वडिलांच्या अचानक जाण्याचा धक्का ही मुले पचवू शकत नाहीत. त्यांना सावरण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात.

Web Title: Do not make the children orphaned by suicide!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.