गुजरातला पाणी पळवू देणार नाही - भुजबळ
By Admin | Updated: March 12, 2015 01:31 IST2015-03-12T01:31:52+5:302015-03-12T01:31:52+5:30
महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला पळवू देणार नाही, असा इशारा देत या संबंधीचा करार आमच्या सरकारच्या काळातही झाला

गुजरातला पाणी पळवू देणार नाही - भुजबळ
मुंबई : महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला पळवू देणार नाही, असा इशारा देत या संबंधीचा करार आमच्या सरकारच्या काळातही झाला असेल तर तो रद्द करा, अशी मागणी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आज विधानसभेत केली.
ते म्हणाले की दमणगंगा-पिंजाळ आणि तापी-नारपार या दोन नदीजोड प्रकल्पांद्वारे गुजरातला महाराष्ट्राचे पाणी दिले जात आहे. हेच पाणी महाराष्ट्रात वापरले तर उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याचा पाणीप्रश्न सुटेल व मुंबईलादेखील मुबलक पाणी मिळेल. या बाबतचा करार आमच्या सरकारमध्ये झालाही असेल पण असे सामंजस्य करार आधी अनेकदा रद्द झालेले आहेत मग हा देखील करा. आधीच्या कोणत्या मुख्यमंत्र्यांनी, मंत्र्यांनी करार केला असेल पण पाणी देण्याचा अधिकार या सार्वभौम सभागृहाला आहे. महाराष्ट्राचे थेंबभरही पाणी देणार नाही, अशी भूमिका या सभागृहाने एकमताने घेतली पाहिजे आणि त्यासाठी सध्याच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे.
मुख्यमंत्र्यांना उद्देशून भुजबळ म्हणाले की, समोर गुजरात असल्याने आपली अडचण होत आहे, हे मी समजू शकतो पण महाराष्ट्राचे हक्काचे पाणी कोणाला का द्यायचे? पाणी पळविण्याच्या मुद्यावर सध्या आझाद मैदानावर धरणे आंदोलन सुरू आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मुख्यमंत्र्यांनी यावर स्पष्ट केले की या संबंधीचा करार आपल्याच सरकारने केला होता. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की त्यावेळी सामंजस्य कराराचा केवळ मसुदा तयार करण्यात आला होता. त्याचा पुनर्विचार केला जावू शकतो. (विशेष प्रतिनिधी)