खोटे निष्कर्ष काढून तेढ वाढवू नका : चंद्रकांतदादा

By Admin | Updated: February 22, 2015 02:20 IST2015-02-22T02:20:54+5:302015-02-22T02:20:54+5:30

ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागे अनेक कंगोरे असू शकतात. प्रसारमाध्यमांनी पुराव्याशिवाय निष्कर्ष काढत समाजात तेढ निर्माण करू नये.

Do not let the false conclusions go far away: Chandrakant Dada | खोटे निष्कर्ष काढून तेढ वाढवू नका : चंद्रकांतदादा

खोटे निष्कर्ष काढून तेढ वाढवू नका : चंद्रकांतदादा

शासनाची भूमिका : पानसरे यांच्यावरील हल्ला निषेधार्ह; कोणतीही विचारधारा असो, कठोर शासन होईलच

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्यामागे अनेक कंगोरे असू शकतात. प्रसारमाध्यमांनी पुराव्याशिवाय निष्कर्ष काढत समाजात तेढ निर्माण करू नये. पोलीस त्यांची भूमिका चोख बजावत आहेत. हल्लेखोर कोणत्याही विचारधारेचा असला तरी त्याला पकडून कठोर शासन झालेच पाहिजे, हीच शासनाची भूमिका आहे, असे स्पष्टीकरण पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शनिवारी उजळाईवाडी विमानतळावर प्रसारमाध्यमांशी बोलताना केले.
मंत्री पाटील म्हणाले, पानसरे यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. नैसर्गिक श्वासोच्छ्वास सुरू होण्यासाठी अत्याधुनिक उपचारांची गरज असल्यानेच पानसरे कुटुंबीय, डॉक्टर्स यांच्याशी चर्चा करूनच त्यांना मुंबईला हलविण्यात आले होते. शुक्रवारी मुंबईत पोहोचल्यानंतर सहा ते दहा वाजेपर्यंत पानसरे यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले; मात्र उपयोग झाला नाही.
पानसरे हे पुरोगामी विचारांचे प्रेरणास्थान होते. पुरोगामी चळवळ ही एक बाजू झाली. माणसाच्या जीवनात अनेक अंग असतात, अनेक भूमिकांमधून माणूस जगत असतो. हे सर्व पर्याय समोर ठेवून पोलीस तपास करीत आहेत. गुप्ततेच्या कारणास्तव तपासाचे सर्व कंगोरे खुले करणे योग्य नाही. पोलीस अधीक्षक डॉ. मनोजकुमार शर्मा गेल्या पाच दिवसांत सलग दोन तासही झोपलेले नाहीत. पोलीस प्रयत्नांची शिकस्त करीत आहेत. नाहक आरोप करून पोलिसांचे मनोबल कमी करू नका, असा सल्ला पाटील यांनी दिला.
पानसरे यांच्यावरील हल्ला हा प्रतिगामी शक्तींनी केला, असे ठामपणे म्हणण्यात काहीच अर्थ नाही. ठोस पुरावे असल्यास पोलिसांना द्या. नाहक आरोप करून साप साप म्हणून भुई थोपटणे योग्य नाही. पानसरे यांच्यावरील हल्ला हा भ्याडपणाचे लक्षण आहे. कोणत्याही प्रकारचा विरोध हा कायद्याच्या चौकटीत राहूनच केला पाहिजे, असे मत मंत्री पाटील यांनी व्यक्त केले.

Web Title: Do not let the false conclusions go far away: Chandrakant Dada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.