विमानतळाच्या कामात अडथळा नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2016 02:43 IST2016-08-01T02:43:48+5:302016-08-01T02:43:48+5:30

आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे.

Do not interfere in the work of the airport | विमानतळाच्या कामात अडथळा नको

विमानतळाच्या कामात अडथळा नको

कमलाकर कांबळे,

नवी मुंबई- आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प देशाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. त्यामुळे निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होणे आवश्यक आहे. प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सर्व परवानग्या प्राप्त झालेल्या आहेत. बहुतांशी अडथळे दूर झालेले आहेत. प्रकल्पग्रस्तांचा विरोध ही एकमेव बाब महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या आड येत आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी एकांगी भूमिका न घेता विमानतळ प्रकल्पाच्या उभारणीला सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन सिडकोने करण्यात आले आहे.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पात प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन हा महत्त्वाचा मुद्दा असल्याने सिडकोने त्यासंदर्भात अधिक खबरदारी बाळगली आहे. संपादित जमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना देशातील सर्वोच्च असे पुनर्वसन पॅकेज देण्यात आले आहे. यात २२.५ टक्के भूखंडाचे वाटप, राहत्या घराच्या बदल्यात अन्य ठिकाणी तिप्पट जागा, नवीन घर बांधणीसाठी खर्च , स्थलांतरणासाठी भाडे देऊ केले आहे. असे असतानाही पदरात अधिक पाडून घेण्याची प्रकल्पग्रस्तांची मानसिकता या प्रकल्पाला अडथळा ठरताना दिसत आहे. त्यामुळे चर्चेने सुटणाऱ्या प्रश्नांसाठी संपूर्ण प्रकल्पालाच वेठीस धरणे योग्य नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांसंदर्भात सिडकोने नेहमीच लवचिक भूमिका घेतली आहे. काही मागण्या तांत्रिक अडचणीमुळे निर्णय प्रक्रियेत आहेत. काही अपवादात्मक मागण्या वगळता सिडकोने प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ही वस्तुस्थिती असतानाही प्रकल्पग्रस्त व त्यांच्या नेत्यांनी नवनवीन मागण्यांचा रेटा लावूनच धरला. त्यासाठी प्रकल्पग्रस्तांनी सिडकोबरोबर असहकाराची भूमिका घेतली आहे. विमानतळ प्रकल्पांच्या कामात अडथळे आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. पुष्पकनगर येथील विकासकामात खोडा घालण्याचे प्रयास काही घटकांकडून केले जात आहेत. साडेबावीस टक्के भूखंडांचे करारनामे करण्याबाबत अपेक्षित सहकार्य मिळत नाही. गावांच्या स्थलांतर प्रक्रियेला प्रतिसाद दिला जात नाही. या सर्व प्रकारामुळे प्रकल्पाचे काम रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यापार्श्वभूमीवर प्रकल्पग्रस्तांनी यासंदर्भात सकारात्मक भूमिका घेण्याची गरज असल्याचे मत सिडकोने व्यक्त केले आहे. प्रकल्पग्रस्तांच्या बहुतांशी मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. उर्वरित मागण्यांसंदर्भात चर्चेतून तोडगा निघेल, प्रकल्पग्रस्त व त्यांच्या नेत्यांनी याचा विचार करणे गरजेचे असल्याचे मत सिडकोच्या वतीने व्यक्त करण्यात आले आहे.
जीवनमान उंचावणारा प्रकल्प
आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे नवी मुंबईचा नव्हे, तर देशाचा नावलौकिक होणार आहे. त्यामुळे स्थानिकांचे जीवनमान उंचावणार आहे. त्यांच्या जमिनींना कोट्यवधींचे दर प्राप्त होणार आहेत. त्यांच्या पुढच्या पिढीच्या उत्कर्षाचा मार्ग सुकर होणार आहे. एकूणच देशाच्याच नव्हे, तर स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्त व त्यांच्या नेत्यांनी त्याबाबत सकारात्मक भूमिका घेणे गरजेचे असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे.
संपादित जमिनीच्या बदल्यात प्रकल्पग्रस्तांना २२.५ टक्के भूखंडाचे वाटप, राहत्या घराच्या बदल्यात अन्य ठिकाणी तिप्पट जागा, नवीन घरबांधणीसाठी खर्च, स्थलांतरणासाठी भाडे देऊ केले आहे.

Web Title: Do not interfere in the work of the airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.