खासगी वाहनांवर ‘स्टिकर’ लावण्यास मज्जाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2015 02:38 IST2015-09-14T02:38:51+5:302015-09-14T02:38:51+5:30
समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्यातील दोन लाखांवर ‘खाकी’ वर्दीवाल्यांना आता आपल्या खासगी वाहनांवर पोलिसांचे स्टिकर, लोगो लावता येणार नाही
_ns.jpg)
खासगी वाहनांवर ‘स्टिकर’ लावण्यास मज्जाव
जमीर काझी, मुंबई
समाजातील कायदा व सुव्यवस्था कायम राखण्याची जबाबदारी असणाऱ्या राज्यातील दोन लाखांवर ‘खाकी’ वर्दीवाल्यांना आता आपल्या खासगी वाहनांवर पोलिसांचे स्टिकर, लोगो लावता येणार नाही. समाजातील इतर घटक व सर्वसामान्य नागरिकांवर त्याद्वारे अप्रत्यक्ष दबाव टाकण्यासाठी त्याचा गैरवापर केला जात असल्याचा गृह विभागाचा आक्षेप आहे. त्यामुळे त्याचा वापर केल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, असा दम गृह विभागाने दिला आहे.
राज्यभरातील ५३ पोलीस घटकांना त्याबाबत योग्य प्रकारे सूचित करण्यात यावे, अशी सूचना पोलीस महासंचालकांना देण्यात आलेली आहे. त्यामुळे वाहनांवर पोलीस स्टिकर, लोगोच्या वापराबाबत लवकरच मार्गदर्शक तत्त्वे लागू करण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असणाऱ्या पोलिसांकडून अनेकदा त्याचे उल्लंघन केले जाते. वर्दीचा हा गैरवापर प्रामुख्याने त्यांच्याकडून वापरल्या जाणाऱ्या वैयक्तिक वाहनांद्वारे केला जातो. अनेकवेळा नो पार्किंग, हेल्मेट न वापरणे, एकमार्गी वाहतूक (वन वे) असलेल्या मार्गावरील नियमाची पायमल्ली केली जाते़ जणू हा नियम सर्वसामान्य नागरिकांसाठी असून आपल्यासाठी तो लागू नाही, असा त्यांचा समज असतो़ त्यासाठी बहुतेक पोलीस हे आपल्या टू-व्हिलर, फोर-व्हिलरवर पोलीस, असे अक्षर लिहिलेले स्टिकर किंवा बोधचिन्ह वाहनांच्या पुढील व पाठीमागील बाजूला लावले जाते. त्याबाबत अनेक वेळा न्यायालयासह मानवी हक्क आयोगाने गृह विभागाचे कान टोचले आहेत. सरकारी वाहनाव्यतिरिक्त स्वत:च्या वाहनांवर असा वापर करणे, बेकायदेशीर आहे़ त्यामुळे समाजातील इतर घटकांवर अप्रत्यक्षपणे दबाव टाकला जातो़ यामुळे अशा प्रकारला मनाई करावी, अशा अनेक तक्रारी मुख्यमंत्री व गृह विभागाकडे आहेत. त्यामुळे खासगी वाहनांवर स्टिकर लावण्यास मज्जाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार कोणत्याही पोलीस अधिकारी/कर्मचाऱ्याने आपल्या खासगी वाहनावर ‘पोलीस’ अशी पाटी लावणे किंवा पोलीस विभागाचे चिन्हा लावणे/चिटकवणे बेकायदेशीर असल्याचे नमूद केले आहे. त्याचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे स्पष्ट केले असून त्याबाबत राज्यभरातील सर्व पोलीस घटकांना सूचना करण्यात यावी, असे पोलीस महासंचालकांना सूचित करण्यात आले आहे.