मुद्रकांच्या दबावाला बळी पडणार नाही
By Admin | Updated: July 24, 2015 01:45 IST2015-07-24T01:45:21+5:302015-07-24T01:45:21+5:30
पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांची छपाई राज्यातील मुद्रकांना देण्यास शिक्षण खात्याची तयारी आहे. मात्र त्यांनी अन्य राज्यातील मुद्रक ३०

मुद्रकांच्या दबावाला बळी पडणार नाही
मुंबई : पाठ्यपुस्तक मंडळाच्या पुस्तकांची छपाई राज्यातील मुद्रकांना देण्यास शिक्षण खात्याची तयारी आहे. मात्र त्यांनी अन्य राज्यातील मुद्रक ३० टक्के कमी दरात पुस्तके छापायला तयार आहेत त्या दरात काम करायची तयारी दाखवायला हवी. ‘मेक इन महाराष्ट्राचे काय होणार’ अशा बातम्या छापून आणून कितीही दबाव आणला तरी त्याला बळी पडणार नाही, असा इशारा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिला.
जगन्नाथ शिंदे यांनी याबाबत नियम ९३ अन्वये चर्चेचा प्रस्ताव दिला होता. त्यावर तावडे म्हणाले की, पाठ्यपुस्तक मंडळ राज्यातील मुद्रकांनाच पुस्तक छपाईचे काम द्यायचे. कालांतरानी त्यांनी आपला गट स्थापन केला. १९९६-९७मध्ये पुस्तक छपाईकरिता २५ टक्के दरवाढीची मागणी केली. २००१ व २००३मध्ये त्यांनी पुन्हा दरवाढ मागितली. तत्कालीन शिक्षणमंत्री अमरिश पटेल यांनी निविदा मागवून पुस्तक छपाईचे काम देण्याचा निर्णय घेतला.
राज्यातील मुद्रकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. परंतु त्यांना यश मिळाले नाही. त्या वेळी निविदांमध्ये ३० टक्के दर कमी आले. त्यामुळे अन्य राज्यातील मुद्रक ज्या दरात ही पुस्तके छापतात त्या दरात पाठ्यपुस्तक छपाईस राज्यातील मुद्रकांनी तयारी दाखवली तर त्यांना हे काम दिले जाईल, असे ते म्हणाले. मुद्रकांबाबत विनोद तावडे यांनी घेतलेल्या या भूमिकेची नंतर सर्वत्र चर्चा सुरू होती.
(विशेष प्रतिनिधी)