अंडरवर्ल्डला भीक घालू नका!
By Admin | Updated: August 28, 2014 03:26 IST2014-08-28T03:26:16+5:302014-08-28T03:26:16+5:30
अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या तर त्यांना भीक घालू नका, त्यांना एकही पैसा देऊ नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या व्यावसायिक, उद्योगपतींसह बॉलीवूडला केले आहे.

अंडरवर्ल्डला भीक घालू नका!
मुंबई : अंडरवर्ल्डकडून धमक्या आल्या तर त्यांना भीक घालू नका, त्यांना एकही पैसा देऊ नका, असे आवाहन मुंबई पोलिसांनी मुंबईतल्या व्यावसायिक, उद्योगपतींसह बॉलीवूडला केले आहे. तसेच ज्या कोणाला खंडणीसाठी धमक्या मिळतील त्यांच्या सुरक्षेची हमीही पोलिसांनी घेतली आहे.
डोके वर काढू पाहणाऱ्या अंडरवर्ल्डशी दोन हात करण्यासाठी मुंबई पोलिसांनी विशेष अॅक्शन प्लान आखला आहे. धमक्या, गोळीबारापेक्षा प्रसिद्धीच्या जोरावर अंडरवर्ल्डमधल्या अनेक टोळयांनी आजवर आपली दहशत निर्माण केली होती. एकाला धमक्या द्यायच्या, एकाच्या घरावर बेछूट गोळीबार करायचा, माध्यमांमधील वृत्तांच्या जोरावर अनेकांवर दहशत निर्माण करायची हा अंडरवर्ल्डचा फंडा होता. मात्र अंडरवर्ल्डचे हेच अस्त्र निकामी करण्याचे मुंबई पोलिसांनी ठरवले आहे. बॉलीवूडमधील निर्माते अली मोरानी यांच्या निवासस्थानी झालेल्या गोळीबार प्रकरणानंतर पोलिसांची भूमिका स्पष्ट होते.
मोरानी यांच्या घरावर शनिवारी रात्री अज्ञात हल्लेखोरांनी चार गोळया झाडून पळ काढला. मात्र या घटनेची वाच्यता पोलिसांनी मुद्दामहून टाळली. त्यामुळे माध्यमे या गोळीबाराबाबत अनभिज्ञ होती. गोळीबार करवून दोन दिवस झाले तरी एकाही वर्तमानपत्रात, वृत्तवाहिनीवर बातमी नाही हे पाहून गँगस्टर रवी पुजारी कासावीस झाला. अखेर सोमवारी दुपारच्या सुमारास त्याने स्वत:हून फोन करून मुंबईतल्या अनेकांना मोरानीच्या घरावर गोळीबार केला, अभिनेता शाहरूख खान पुढले टार्गेट असेल, अशी बोंबाबोंब सुरू केली, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
(प्रतिनिधी)