नापासांसाठी नको आॅक्टोबरची वारी; जूनमध्येच झालेली बरी !
By Admin | Updated: March 24, 2015 00:12 IST2015-03-23T23:08:39+5:302015-03-24T00:12:17+5:30
दहावी, बारावी : कर्नाटकात सुरू आहे १४ वर्षापासून परीक्षा--पुरवणी परीक्षा घ्या नापासांचे वर्ष वाचव१ा

नापासांसाठी नको आॅक्टोबरची वारी; जूनमध्येच झालेली बरी !
कर्नाटकात दहावी आणि बारावीत नापास विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षा घेतली जाते. दहावीसाठी बंगलोरमधील कर्नाटक राज्य माध्यमिक परीक्षा मंडळ, तर बारावीसाठी पदवीपूर्व शिक्षण परीक्षा मंडळ गेल्या चौदा वर्षांपासून यशस्वीपणे पुरवणी परीक्षा घेते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्यादृष्टीने महाराष्ट्र शासनालाही हा निर्णय घेणे शक्य आहे. मध्यंतरी शैक्षणिक वर्तुळात तशी चर्चाही झाली. अभ्यास झाला, मात्र निर्णय राहिला. सध्या परीक्षांचा हंगाम सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटकातील पुरवणी परीक्षा व्यवस्था काय आहे, कशी राबविली जाते, त्याचा विद्यार्थ्यांना थेट फायदा कसा होतो याचा वेध घेणारी मालिका आजपासून....
भीमगोंडा देसाई - कोल्हापूर
दहावी आणि बारावीच्या परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देण्यासाठी आॅक्टोबरची वाट पहावी लागते. यात या विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाया जाते. ते जाऊ नये यासाठी कर्नाटकने १४ वर्षापूर्वी उपाय शोधला. नापासांसाठी जूनमध्येच पुरवणी परीक्षा घेणे सुरू केले. यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना लगेच पुढच्या वर्षात प्रवेश मिळू लागला. गेल्या १४ वर्षांत लाखो विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ झाला आहे.महाराष्ट्रात अशी परीक्षा सुरू केल्यास नापास विद्यार्थ्याना शैक्षणिक वर्ष वाया जाणे थांबवण्याची संधी मिळणार आहे.
महाराष्ट्रालगत कर्नाटक असल्याने अनेक शासकीय निर्णयात साधर्म्य आहे. सन २००१ मध्ये संपूर्ण कर्नाटकात पुरवणी परीक्षा घेण्याचा निर्णय झाला. त्याची अंमलबजावणी अखंडपणे सुरू आहे. तेथे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य परीक्षा घेणे, त्यानंतर नापासांसाठी पुरवणी परीक्षा घेणे, वेळेत निकाल लावणे यासाठी एकच परीक्षा मंडळ आहे. बारावीसाठीही अशीच व्यवस्था आहे. याउलट कामाच्या सोयीसाठी महाराष्ट्रात दहावी-बारावीसाठी पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण असे विभाग आहेत. कार्यक्षेत्र तीन ते चार जिल्ह्यांचे आहे. विभागातून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ परीक्षा घेणे, निकाल लावणे अशी प्रक्रिया प्रत्येक वर्षी राबविली जाते.
कर्नाटकात मार्च, एप्रिल महिन्यात परीक्षा घेतली जाते. दीड महिन्यांच्या आत निकाल लावला जातो. नापास विद्यार्थ्यांसाठी जून महिन्यात पुरवणी परीक्षा घेतली जाते. त्यामुळे मुख्य परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसोबत पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांनाही पुढच्या वर्गात प्रवेश घेता येतो. जून महिन्यात प्रवेश प्रक्रिया सुरू झाली तरी पुरवणी परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी राखीव जागांतून किंवा आवश्यकतेनुसार वाढीव जागा निर्माण केल्या जातात. पुरवणी परीक्षेमुळे मुख्य परीक्षेसाठी केलेला अभ्यास विसरण्यापूर्वीच पुरवणी परीक्षा होत असल्यामुळे पास होण्यासाठी फायदा होतो. महाराष्ट्रात मुख्य परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आॅक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात परीक्षा घेतली जाते. महिन्यानंतर निकाल लागतो. या संपूर्ण प्र्रक्रियेला निम्मे वर्षे जाते. पुढच्या वर्गासाठी प्रवेशाचे दरवाजे बंद होतात. शैक्षणिक वर्षाचे नुकसान होते. मुख्य परीक्षेनंतर सहा महिन्यांनी परीक्षा होत असल्यामुळे उत्तीर्ण होण्याचे प्रमाण १५ टक्के आहे. कर्नाटकात पुरवणी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे प्रमाण २५ टक्के आहे. त्यामुळे नापास विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षा आधार ठरली आहे. वर्ष वाया जात नसल्यामुळे वैफल्याची भावना येत नाही.
दहावी, बारावी पुरवणी परीक्षा १४ वर्षांपासून घेतली जाते. निकालही वेळेवर लावला जातो. पुरवणी परीक्षेचा निकाल २५ टक्क्यांपर्यंत लागतो. कोणत्याही कारणामुळे पुरवणी परीक्षा घेण्यात खंंड पडलेला नाही. निकालही वेळेवर लावण्याकडे लक्ष दिले जाते. - एस. जयकुमार, संचालक, शिक्षण संशोधन प्रशिक्षण विभाग,कर्नाटक