भांडणे लावण्याचा धंदा करू नका!

By Admin | Updated: April 9, 2015 02:59 IST2015-04-09T02:59:21+5:302015-04-09T02:59:21+5:30

आमच्यात व भाजपात जे मतभेद होते ते आता दूर झालेले आहेत, त्यामुळे शरद पवार यांनी लावालावी करायचा प्रयत्न करू नये़ सध्या काही कामधंदा नाही म्हणून त्यांनी

Do not argue! | भांडणे लावण्याचा धंदा करू नका!

भांडणे लावण्याचा धंदा करू नका!

मुंबई : आमच्यात व भाजपात जे मतभेद होते ते आता दूर झालेले आहेत, त्यामुळे शरद पवार यांनी लावालावी करायचा प्रयत्न करू नये़ सध्या काही कामधंदा नाही म्हणून त्यांनी पोपटाप्रमाणे भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केला आहे का, अशी उपरोधिक टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी केली.
वांद्रे (पूर्व) मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील युतीच्या उमेदवार तृप्ती सावंत यांच्या प्रचारासाठी खार (पू) येथील जयहिंद नगर पाइपलाइनजवळ झालेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांची अवस्था आता अडला नारायण नव्हे तर पडला नारायण अशी करा, असे आवाहन त्यांनी या वेळी उपस्थितांना केले.
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल यांनी कॉँग्रेसचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारसभेत शिवसेना, उद्धव ठाकरे व पंतप्रधान मोदींवर कडाडून टीका केली. त्याला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले, की शिवसेना बदलली असे जे पवार म्हणताहेत ते खरेच आहे. कारण शिवसेनाप्रमुख त्यांना मैद्याचे पोते, बारामतीचा म्हमद्या म्हणत होते़ मी पवार साहेब म्हणतो; कारण माझ्यावर चांगले संस्कार झालेले आहेत. त्यामुळेच तासगाव मतदारसंघात युतीने उमेदवार उभा केला नाही. तुम्ही मात्र गद्दारीला जागत आहात. बाळासाहेबांची ही मर्दाची सेना असून, येत्या निवडणुकीत नारायण राणेंना कायमचा गाडल्याशिवाय राहणार नाही. भाजपाबरोबर आमचे उघडपणे मतभेद होते, ते आता मिटलेले आहेत. त्यामुळे सरकार पडणार की राहणार, याची तुम्ही चिंता करू नका़ ते स्थिर राहून उत्तम कारभार करेल़ आता तुम्हाला काही कामे उरलेली नसल्यामुळे पोपटाप्रमाणे भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केला असल्यास माझी काही हरकत नाही.
नारायण राणे व ओवेसी बंधूवर कडाडून टीका करून ते म्हणाले, की शिवसेनाप्रमुखांनीच त्यांना मुख्यमंत्री केले होते आणि त्यांनीच लाथ मारून हाकलले. आता तेच मातोश्रीच्या अंगणात चाल करून येत आहेत़ त्यामुळे त्याला आता ‘अडला नाही तर गाडला नारायण करावयाचे आहे. शेवटच्या दोन दिवसांत पैशांचा वापर करून माणसे फोडण्याचा प्रयत्न केला जाईल.
त्यामुळे प्रत्येकाने सावध राहून जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी प्रयत्न करावेत. या वेळी खासदार रामदास आठवले, पर्यावरणमंत्री रामदास कदम, खासदार अरविंद सावंत, नीलम गोऱ्हे, भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार आदींहीची भाषणे झाली. (प्रतिनिधी)

Web Title: Do not argue!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.