मतांच्या मागे लागू नका, लोकांची मनं जिंका - राज ठाकरे
By Admin | Updated: November 22, 2014 12:02 IST2014-11-22T10:44:22+5:302014-11-22T12:02:32+5:30
लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे राजकारणात महत्वाचे असते असं सांगत मतांच्या मागे पळण्यापेक्षा लोकांची मनं जिंका असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

मतांच्या मागे लागू नका, लोकांची मनं जिंका - राज ठाकरे
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - राजकारणात फक्त निवडणूक महत्वाची नसते लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणेही महत्वाचे असते असं सांगत मतांच्या मागे पळण्यापेक्षा लोकांची मनं जिंका असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्यातील मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. लोकं तुमच्यापासून दूर गेली नाही तर तुम्हीच त्यांच्यात मिसळला नाहीत असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण केले व कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना काही मोलाचे सल्लेही दिले.
पक्षाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर गेलात तर पक्षाच्या बाहेर जाल असे सांगत पक्षात बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक वेळेसआंदोलनं, मारहाणं करूनच कामं होत नाहीत, लोकांशी चांगले संबंद प्रस्थापित करू, माणुसकीने वागूनही कामं करून घेतात येताता असा सल्ला त्यांनी दिला.
तसेच कार्यकर्त्यांच्या होर्डिंगबाजीवरही त्यांनी नाराजी वर्तवली. होर्डिंग लावून कोणीही मोठा अथवा महान होत नसतो. यापुढे महाराष्ट्रात एकाही पदाधिका-याच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लागलेले दिसले तर दुस-या दिवसापासून तो पदावर राहिलेला दिसणार नाही असा इशारा त्यांनी दिला.
राजकारण म्हणजे समाजकारण असतते. फक्त रक्तदान शिबीरं, फळं आणि वह्या वाटप करत बसू नका तर लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवा. त्यांना काय हवयं ते विचारा, असं काम करा की तुम्ही त्यांच्या कायम लक्षात रहाल.
पक्षातील कोणालाही कसलीही तक्रार अथवा सूचना करायची असेल, काही नवीन कार्यक्रम राबवायचे असतील तर connectrajthackeray@gmail.com या आयडीवरून माझ्याशी संपर्क साधून माहिती पाठवा असेही त्यांनी सांगितले.