गर्भावशेषाच्या डीएनए परीक्षणात अत्याचार सिद्ध
By Admin | Updated: November 30, 2014 00:59 IST2014-11-30T00:59:49+5:302014-11-30T00:59:49+5:30
आत्महत्या केलेल्या पीडित १५ वर्षीय मुलीच्या गर्भ अवशेषाच्या डीएनए परीक्षणात अत्याचार सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या न्यायालयाने एका नराधमाला १० वर्षे सश्रम

गर्भावशेषाच्या डीएनए परीक्षणात अत्याचार सिद्ध
आरोपीला १० वर्षे कारावास : पीडित मुलीने केली होती आत्महत्या
नागपूर : आत्महत्या केलेल्या पीडित १५ वर्षीय मुलीच्या गर्भ अवशेषाच्या डीएनए परीक्षणात अत्याचार सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या न्यायालयाने एका नराधमाला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली.
कान्हा हंकर कोवे (२२) असे आरोपीचे नाव असून, तो पारडीच्या गोंड मोहल्ला येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी ही भांडेवाडी कोष्टीपुरा येथे राहत होती. आई-वडिलांची ताटातूट झाल्यानंतर पीडित मुलगी ही आपल्या आजीसोबत राहत होती. आजी भीक मागून प्रपंच भागवीत होती.
कान्हाने नातेसंबंधातील या मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. या संबंधाआड तो लैंगिक शोषणही करायचा. ती गरोदर होती. काही दिवस संबंध ठेवून अचानक त्याने संबंध तोडले होते. तिच्याशी दगाबाजी केली होती. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन तिने २३ जानेवारी २०१३ रोजी मोहल्ल्यातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती.
मृत मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३७६ (२) (एफ)(एच)(एम) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करून २४ जानेवारी रोजी आरोपी कान्हा कोवे याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक व्ही. सोनवणे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते.
मृत मुलीच्या उत्तरीय तपासणीनंतर तिचे पुरुष जातीचे गर्भावशेष डीएनए परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यात मृत मुलगी आणि आरोपी कान्हा हे मृत अर्भकाचे जैविक पालक असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता.
दोन्ही शिक्षा एकत्र
न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३७६ कलमांतर्गत तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाच्या कलम ५, ६ अन्वये प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल अनिल गजभिये, नायक पोलीस भास्कर बनसोड यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)