यंदा दिवाळी आॅनलाईन
By Admin | Updated: October 16, 2014 00:04 IST2014-10-15T22:02:45+5:302014-10-16T00:04:54+5:30
अॅण्ड्रॉईडचे वाढते प्रस्थ : दिवाळीच्या खरेदीसाठी आॅनलाईन खरेदीला पसंती

यंदा दिवाळी आॅनलाईन
सागर पाटील - टेंभ्ये --दिवाळी म्हणजे आनंदाचा, समृद्धीचा सण. विविध प्रकारच्या फराळाबरोबर घरातील सर्वांसाठी कपड्यांची खरेदी आवर्जून केली जाते. यावर्षीची दिवाळी मात्र आॅनलाईन होण्याची शक्यता आहे. आॅनलाईन पध्दतीने सध्या मोठमोठ्या कंपन्यांतून खरेदी केली जात आहे. गर्दीमधून बाजारात जाऊन भरमसाठ किमतीला कपडे खरेदी करण्यापेक्षा घरी बसून जास्तीत जास्त सवलतीमध्ये खरेदीचा पर्याय अनेकजण निवडताना दिसत आहेत. अॅण्ड्रॉईड मोबाईलमुळे आॅनलाईन खरेदीचा प्रकार वाढला असल्याचे चित्र दिसून येत आहे. दिवाळीची खरेदी करण्यासाठी अक्षरश: दिवाळीपूर्वी १५ दिवसांपासून सर्व बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहतात. कपड्यांच्या दुकानांमध्ये अक्षरश: पाय ठेवायला जागा नसते. अशावेळी सांगेल त्या किमतीला ग्राहकाला कपडे खरेदी करावे लागतात. सध्या मात्र या खरेदीला आॅनलाईन खरेदीचा एक उत्तम पर्याय उपलब्ध झाल्याचे पाहायला मिळत आहे. अनेक कंपन्यांनी ग्राहकांना आॅनलाईन खरेदीसाठी आकर्षित करण्याचे आटोकाट प्रयत्न सुरु केले आहेत. एका वस्तूच्या खरेदीवर एक वस्तू मोफत, ५० ते ७५ टक्के किमतीपर्यंत सवलत यांसारख्या अनेक योजना या कंपन्यांनी आणल्या आहेत. अॅण्ड्रॉईड मोबाईलवर या कंपन्यांनी आपली अॅप्स तयार केल्याने इंटरनेटवरच खरेदीचे प्रमाण वाढले आहे.सध्या अॅण्ड्रॉईड मोबाईल मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याने संबंधित कंपन्यांची अॅप्स मोबाईलमध्ये उपलब्ध आहेत. आॅनलाईन खरेदीमध्ये कपड्यापासून सर्व प्रकारच्या वस्तू उपलब्ध असल्याने या कंपन्यांमार्फत खरेदीला प्राधान्य दिले जात आहे. खरेदी करण्याची पद्धत सहजसोपी असल्याने तसेच वस्तू मिळाल्यानंतर पैसे देण्याची तरतूद असल्याने फसवणुकीचा प्रश्न निर्माण होत नसल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. अगदी ४० ते ५० हजारांपर्यंतच्या वस्तूदेखील या माध्यमातून विकत घेतल्या जात आहेत. इंटरनेटवरून होणाऱ्या खरेदीमध्ये कपड्यांबरोबरच सर्वाधिक विक्री आहे ती मोबाईल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंच्या साहित्याची. ही खरेदी आॅनलाईन पद्धतीने होताना दिसत आहे. यावर्षीच्या दिवाळीची खरेदी बऱ्याचअंशी आॅनलाईन पद्धतीने केली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुकानदारही त्याबाबत साशंक आहेत. यावर्षी प्रत्यक्ष खरेदीला कमी प्रतिसाद मिळणार असल्याने दुकानदारांनीही माल आटोक्यातच ठेवला आहे.
दर्जा उत्तम असल्याने ग्राहकही समाधानी
आॅनलाईन पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होत आहे. ५० ते ७५ टक्के सवलत असल्याने वस्तू कमीत कमी दरात मिळत आहेत. वस्तूंच्या दर्जामध्येदेखील कोणतीही तडजोड केली जात नाही. त्यामुळे ही पद्धत उपयुक्त वाटत आहे.
- विजय जगताप,
जागुष्टे कॉलनी, कुवारबाव्
दिवाळी म्हणजे आनंदाचा, मांगल्याचा सण. यानिमित्त आसुरी शक्तीचा नाश करणे आणि जीवनात सत्प्रवृत्ती वाढीला लावणे हे सूत्र डोळ्यासमोर येते. घरातील सर्वांसाठी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली जाते. कपडे, फराळ, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची रोख खरेदी व्हायची. मात्र, आता ती आॅनलाईनवर होते.ा