पत्नीचे वजन वाढल्याने मागितला घटस्फोट!
By Admin | Updated: June 23, 2014 12:41 IST2014-06-23T12:39:49+5:302014-06-23T12:41:56+5:30
पत्नीच्या वाढत्या वजनाचे कारण देत पतीने घटस्फोटासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, घटस्फोटासाठी वजन वाढीचे कारण अयोग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली आहे.

पत्नीचे वजन वाढल्याने मागितला घटस्फोट!
याचिका फेटाळली : मुंबई उच्च न्यायालयातील प्रकरण
मुंबई : पत्नीच्या वाढत्या वजनाचे कारण देत पतीने घटस्फोटासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका केली होती. मात्र, घटस्फोटासाठी वजन वाढीचे कारण अयोग्य असल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने पतीची याचिका फेटाळली आहे. पुणे कौटुंबिक न्यायालयाने पतीची याचिका फेटाळल्यानंतर त्यांने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
पत्नीच्या वाढत्या वजनाचा परिणाम आपल्या वैवाहिक जीवनावर होत असल्याचे कारण पतीने याचिकेत दिले आहे. पतीने याचिकेत केलेल्या दाव्यानुसार, लग्नाआधी केलेल्या शस्त्रक्रियेबाबत मुलीच्या कुटुंबियांनी आपल्याला कोणतीही माहिती दिली नव्हती. मात्र लग्नानंतर पत्नीचे वजन झपाट्याने वाढू लागल्यावर सत्य समजले. वजन कमी करण्यासाठी वैद्यकीय उपचार घेण्याचा सल्ला दिला. मात्र, तो ही सल्ला पत्नीने नाकारला. घरातील दैनंदिन कामासही ती टाळाटाळ करते. यामुळे वैवाहिक जीवनाचा आनंद घेता येत नसल्याचे पतीने याचिकेत म्हटले आहे.
सोलापूर येथील एका विवाह मंडळात या पती-पत्नीची भेट झाली होती. त्यावेळी पत्नीने आपल्या शस्त्रिक्रियेबाबत कोणतीही कल्पना दिली नसल्याचे पतीचे म्हणणे आहे. मात्र विवाह मंडळाच्या अर्जात शस्त्रक्रियेबाबत माहितीचा कोणताही रकाना नसल्याने माहिती लिहीली नसल्याचे पत्नीने सांगितले आहे. शिवाय लग्नाआधी नवर्याने कोणत्याही मोठय़ा शस्त्रक्रियेबाबत विचारणा केली नसल्याचा खुलासा पत्नीने केला आहे. दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर, वाढते वजन घटस्फोटासाठी ठोस कारण नसल्याचे सांगत न्यायाधीश एम.एस.सोनक आणि ए.एस.ओक यांच्या खंडपीठाने याचिका फेटाळली आहे. (प्रतिनिधी)