युतीचा घटस्फोट; विदर्भाचे काय?
By Admin | Updated: September 26, 2014 01:14 IST2014-09-26T01:14:16+5:302014-09-26T01:14:16+5:30
स्वतंत्र विदर्भाच्या मार्गात शिवसेना नेहमीच अडथळा ठरत असल्याने, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप या पक्षापासून वेगळा झाल्याने तो स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी शुभसंकेत ठरेल,

युतीचा घटस्फोट; विदर्भाचे काय?
विदर्भवाद्यांच्या प्रतिक्रिया : आंदोलनाच्या मार्गातील अडचण होणार दूर
नागपूर : स्वतंत्र विदर्भाच्या मार्गात शिवसेना नेहमीच अडथळा ठरत असल्याने, विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने भाजप या पक्षापासून वेगळा झाल्याने तो स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी शुभसंकेत ठरेल, अशा प्रतिक्रिया स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी नोंदविल्या.
विधानसभा निवडणुकीसाठी जागा वाटपाच्या मुद्यावरून भाजप आणि शिवसेनेत कमालीचा तणाव निर्माण झाला होता. आता ही २५ वर्षांपासूनची युती अखेर तुटली आहे. या दोन्ही पक्षातील घडामोडींकडे जसे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले होते, तसेच स्वतंत्र विदर्भासाठी आंदोलन करणाऱ्या विविध संघटनाही त्यावर लक्ष ठेवून होत्या. कारण भाजप स्वतंत्र विदर्भाच्या बाजूने असला तरी, मित्र पक्ष शिवसेना विरोधात असल्याने भाजपची कोंडी झाली होती. त्यामुळे सेनेसोबत फरफटत जाण्याशिवाय पर्याय आजवर भाजपपुढे उरला नव्हता. त्यामुळे भाजपने सेनेशी फारकत घेऊन विदर्भाच्या मुद्यावर निवडणुका लढवाव्यात, अशी मागणी विदर्भवादी नेत्यांची होती व त्यांनी वेळोवेळी जाहीरपणे बोलूनही दाखविली होती. आता ही युती तुटली आहे. यासंदर्भात काही प्रमुख विदर्भवादी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली असता, त्यांनी युती भंगल्यास तो विदर्भाच्या मागणीसाठी शुभसंकेत ठरेल, अशी प्रतिक्रिया दिली. यानिमित्ताने विदर्भद्रोही शिवसेनेला विदर्भाच्या हद्दीतून बाहेर काढण्याची संधी मिळेल, जी भाजपमुळे मिळत नव्हती, इतक्या टोक्याच्या प्रतिक्रियाही काही नेत्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)
फटाके फोडू
शिवसेना नेहमीच विदर्भद्रोही राहिली आहे. आता भाजपने शिवसेनेशी फारकत घेतली; त्यामुळे स्वतंत्र विदर्भाच्या मार्गातील प्रमुख अडचण दूर होईल. आपण संघटनेतर्फे फटाके फोडून आनंद व्यक्त करू. या निवडणुकीत ‘सेना हटावो, विदर्भ बचाओ’ असा नारा दिला जाईल व सेनेला विदर्भातून कसे हद्दपार करता येईल, त्यादृष्टीने प्रयत्न केले जातील.
- दीपक निलावार, प्रदेशाध्यक्ष, नवराज्य निर्माण महासंघ
विदर्भासाठी अॅडव्हान्टेज
शिवसेनेपासून वेगळे होऊन भाजपने स्वतंत्र लढल्यास ते विदर्भासाठी अॅडव्हान्टेज ठरेल. भाजपला या निवडणुकीत याचा फायदाही मिळू शकतो; कारण विदर्भवादी त्यांच्या मागे उभे राहू शकतात. स्वतंत्र विदर्भाच्या मुद्यावर शिवसेनेमुळे भाजपची अडचण झाली होती. निवडणुकीच्या निमित्ताने ते वेगळे झाल्याने केंद्रातील भाजप सरकारलाही यासंदर्भात मोकळेपणाने निर्णय घेता येईल. युतीमुळे त्यांना शिवसेनेला नाराज करता येत नव्हते.
- तेजिंदरसिंग रेणू , सचिव, विदर्भ टॅक्स पेअर्स, नागपूर
स्वतंत्र विदर्भासाठी पोषक
निवडणुकीच्या निमित्ताने भाजप आणि शिवसेना युती तुटणे ही घडामोड स्वतंत्र राज्यनिर्मितीच्या आंदोलनासाठी पोषक ठरणारी आहे. कारण शिवसेना कायम विदर्भविरोधी होती. त्यामुळे भाजपची फरफट होत होती. आता भाजपचे स्वबळावर सरकार आले तर भाजपमधील विदर्भवादी स्वतंत्र विदर्भासाठी सरकारवर दबाव आणू शकतील.
- अॅड. श्रीहरी अणे, संस्स्थापक अध्यक्ष, ‘विदर्भ कनेक्ट’