मराठी मतांची विभागणी भाजपाला फायदेशीर
By Admin | Updated: October 10, 2014 05:32 IST2014-10-10T05:32:43+5:302014-10-10T05:32:43+5:30
अवघ्या पाच दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली आहे. प्रचारासाठी तर अवघे तीन दिवस शिल्लक आहेत.
मराठी मतांची विभागणी भाजपाला फायदेशीर
अवघ्या पाच दिवसांवर मतदानाची वेळ येऊन ठेपली आहे. प्रचारासाठी तर अवघे तीन दिवस शिल्लक आहेत. अशावेळी मुंबई उपनगरातील २६ जागांसाठी काँग्रेस, भाजपा, शिवसेना आणि मनसेत अक्षरश: हातघाईच्या लढाईची परिस्थिती निर्माण झाली आहे. जास्तीतजास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार जिवाचा आटापिटा करीत आहेत. पक्षाचे स्टार प्रचारक, खासदार आणि सेलिब्रेटी प्रचारफेऱ्या आणि सभांमध्ये दिसू लागले आहेत.
विद्यमान जागा राखण्यासाठी काँग्रेस उमेदवार जंगजंग पछाडत असताना पुनरागमनासाठी शिवसेना उमेदवारांनी कंबर कसली आहे. तर, गुजराती मतांच्या भरोशावर मुंबईतील सामर्थ्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी भाजपा नेत्यांची धडपड आहे.
गेल्या वेळी उपनगरात ११ ठिकाणी काँग्रेस विजयी झाली. शिवसेना, भाजपा आणि मनसेला प्रत्येकी ४ जागांवर यश मिळाले.
२ जागांवर राष्ट्रवादी आणि शिवाजीनगर मानखुर्द येथे अबू आझमींच्या रूपात सपाला
१ जागा मिळाली. उपनगर असो अथवा महानगर राष्ट्रवादीचे अस्तित्व तसेही औषधापुरतेच असल्याने काँग्रेस, शिवसेना, भाजपा आणि मनसे अशीच चौरंगी लढत येथे रंगू लागली आहे.
उमेदवारांचा व्यक्तिगत जनसंपर्क, परंपरागत मतदारांवर काँग्रेसची मदार आहे. स्वाभाविकपणे शिवसेना व मनसेने मराठी मतांच्या आशेवर आपली राजकीय गणिते मांडली आहेत. तर, गुजराती मतांवर भाजपाचा डोळा आहे. बिगर मराठी मतदारांचा पाठिंबा आणि मराठी मतातील विभाजनाने गेल्या वेळी काँग्रेसने यशाला गवसणी घातली. पण, लोकसभेतील मोदी लाटेने सारी समीकरणे बिघडून टाकली आहेत. गुजराती मते पूर्णपणे भाजपाकडे वळली आहेत. तर युती तुटल्याने उत्तर भारतीय मतांची बेरीजही भाजपासाठी आशादायी आहे. या बेरजेच्या गणिताचा फटका बसू नये यासाठी काँग्रेस उमेदवारांनी सर्व शक्ती पणाला लावली आहे. पण, विद्यमान संख्याबळ कायम राखताना मात्र काँग्रेसची दमछाक होणार आहे.
राज ठाकरेंच्या सभांच्या आधारे
वातावरण बदलण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज यांच्या सभांमुळे मनसेचे इंजिन ट्रॅकवर
येत असल्याचे चित्र असले तरी २००९
प्रमाणे मराठी मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता नाही. मनसेसमोर आहे त्या
जागा राखण्याचे मोठे आव्हान आहे. विकासाचा मुद्दा रेटतानाच गुजराती आणि उत्तर भारतीय राजकारणावर राज ठाकरेंचा आसूड फुटत आहे.
विकासाचे आश्वासन आणि मराठी अस्मितेच्या आधारे आपली मते राखण्याचा मनसेचा प्रयत्न आहे.
पण, भाजपाशी काडीमोड घेतल्यानंतर शिवसेनेने जाणीवपूर्वक मुंबईच्या गुजरातीकरणाचा मुद्दा लावून धरल्याने आता मराठी मतदारांचीच कोंडी झाल्याचे चित्र आहे. पण, भाजपावरील टीकेच्या आधारे मराठी मते राखण्यात शिवसेना काही प्रमाणात यशस्वी होण्याची शक्यता आहे.