दुष्काळग्रस्तांचे शहरात स्थलांतर
By Admin | Updated: August 29, 2016 05:09 IST2016-08-29T05:09:29+5:302016-08-29T05:09:29+5:30
मजुरीचे दर भरमसाट वाढल्याने शहरात बांधकाम तसेच अन्य कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरात अनेक फार्महाऊस असून याठिकाणी कामासाठी मजुरांची गरज भासत आहे

दुष्काळग्रस्तांचे शहरात स्थलांतर
नितीन देशमुख, पनवेल
मजुरीचे दर भरमसाट वाढल्याने शहरात बांधकाम तसेच अन्य कामासाठी मजूर मिळणे कठीण झाले आहे. पनवेल, नवी मुंबई परिसरात अनेक फार्महाऊस असून याठिकाणी कामासाठी मजुरांची गरज भासत आहे. परिणामी सोलापूरसारख्या दुष्काळग्रस्त भागातून नवी मुंबई, पनवेल परिसरात मजूर आणले जात आहेत. कामाच्या शोधात दुष्काळग्रस्तांचे मोठ्या प्रमाणात शहरात स्थलांतर होत आहे.
नवी मुंबई, पनवेल, उरण व कर्जत या भागात अनेक फार्महाऊस आहेत. याशिवाय शेतजमीनही मोठ्या प्रमाणात आहेत. याठिकाणी काम करण्यासाठी मजूर मिळत नसल्याने भरमसाट मजुरी आकारली जात आहे. वेळेवर मजूर मिळत नसल्याने अनेकांचे नुकसानही होत आहे. त्यामुळे सोलापूर, लातूरसारख्या दुष्काळी भागातून कामगार आणले जात आहेत.
स्थलांतरित कामगारांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यास कमी मजुरीत ते कामास तयार होतात. सोलापूरसारख्या भागात चांगली शेती होत नाही, शिवाय उद्योग व्यवसायही फारसे नसल्याने तेथील लोक कामगार म्हणून मुंबईत येण्यास तयार होतात, त्यांना राहण्याच्या आणि जेवणाची व्यवस्था केल्यास ते कमी मजुरीतही काम करण्यास तयार होत असल्याचे एका फार्महाऊस मालकाने सांगितले.
फार्महाऊसच्या कामासाठी माणूस पाहिजे म्हणून नवी मुंबई व कोकणात जाहिरात दिली तर कोणी येत नाही. शेतात काम करण्याची मानसिकता येथील लोकांची राहिलेली नाही. सोलापूरला जाहिरात दिल्यास रोज दोन-तीन फोन येतात. त्यांना इथे येण्या-जाण्याचे तिकीट दिल्यास ते लगेच येण्यास तयार होतात. फार्म हाऊसवर काम पसंत पडल्यास राहतात, काही दिवस काम केल्यावर दुसरीकडे निघून जात असल्याचे फार्म हाऊसचे मालक सांगतात.