जिल्ह्यात पावसाचे ‘ठाणे’
By Admin | Updated: July 2, 2016 03:38 IST2016-07-02T03:38:54+5:302016-07-02T03:38:54+5:30
जिल्ह्यातील सातही तालुक्यांत मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून जून महिन्यात ४४८.४० मिमी पावसाची नोंद झाली.

जिल्ह्यात पावसाचे ‘ठाणे’
ठाणे : जिल्ह्यातील सातही तालुक्यांत मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून जून महिन्यात ४४८.४० मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारपासून संततधार सुरू असून ६४ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९०० मिमी पाऊस झाला आहे. धरण परिसरातही कालपासून पावसाचे प्रमाण चांगले असून शहराना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, बारवी, आंध्रा, तानसा आदी धरणांमध्ये पाऊस पडला आहे. सर्वाधिक २४ मिमी पाऊस भातसा आणि बारवी धरणात झाला आहे. मात्र, धरण क्षेत्राची पातळी सुधारण्याकरिता अजून पावसाची प्रतीक्षा आहे.
भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १२० मिमी पाऊस पडला असून याखालोखाल ठाणे येथे १११ मिमी, उल्हासनगरला ५५मिमी, कल्याण ५४ मिमी, अंबरनाथ ४९ मिमी, शहापूर ४२ मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी म्हणजे १७ मिमी पाऊस मुरबाड तालुक्यात झाल्याची नोंद आहे. आज दिवसभरही सुरू असलेली संततधार वनोत्सवानिमित्तच्या वृक्षलागवडीसाठी उपयुक्त ठरली.
अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाचे आता शहरी भागात दमदार आगमन झाले आहे. गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने मागील वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. मागील वर्षी ठाणे शहर आणि परिसरात १ जुलैपर्यंत ८६२.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, यंदा शुक्रवार, १ जुलैपर्यंत ९०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ठाणे शहराच्या अनेक भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. वंदना सिनेमा, चंदनवाडी, श्रीरंग आदी पाच ठिकाणी पाणी तुंबले होते, असे नियंत्रण कक्षाने सांगितले. ठामपाच्या आपत्कालीन कक्षाकडे एकूण २०तक्र ारींची नोंद झाली. त्यामध्ये १ आग, ९ झाडे कोसळण्याच्या, एक भिंत कोसळल्याच्या तक्रारींचा समावेश होता. तर, शास्त्रीनगर भागातील कांबळे चाळीजवळ असलेला नारळाचा वृक्ष पडून प्रतीक कांबळे हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.
गेली तीन वर्षे पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा अधिक पाऊस पडावा, अशी अपेक्षा सर्वच लोक बाळगून आहेत. पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात पाठ फिरवली. मात्र, त्यानंतर जूनच्या उत्तरार्धातील पंधरवड्यात महिनाभराची पावसाची सरासरी पूर्ण केली. गेल्या २४ तासांत ठाणे शहरात १४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील हा उच्चांक असल्याचे समजते.
दरम्यान, ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी त्या तुलनेत धरण क्षेत्रामध्ये अद्यापही पावसाने हवा तसा जोर पकडलेला नाही.